दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. दुखापतीमुळे आपण गोलंदाजी करू शकत नसल्याचे वॉटसनने सांगितले आहे.
निवड समितीसमोर तंदुरुस्ती चाचणी देण्यासाठी वॉटसनने सोमवारी नेटमध्ये फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव केला. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे वॉटसन पहिल्या कसोटी सामन्याला मुकला होता. वॉटसन म्हणाला, ‘‘फलंदाजीच्या जोरावर आपली संघात निवड व्हावी अशी अपेक्षा आहे. पण या क्षणी मी गोलंदाजी करू शकत नाही.’’ वॉटसन जोपर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकत नाही, तोपर्यंत निवड समिती त्याला संघात स्थान देणार नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या पॅट होवार्ड यांनी म्हटले होते. मात्र मोठी खेळी करण्याची क्षमता असल्यास वॉटसनची संघात निवड केली जाईल, असे निवड समितीचे अध्यक्ष जॉन इनवेरारिटी यांनी सांगत वॉटसनला दिलासा दिला होता.