अव्वल मानांकित स्टॅनिसलास वॉवरिन्काने अल्जाझ बेडेने याचा झंझावात रोखण्याची किमया साधली. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या स्वित्र्झलडच्या वॉवरिन्काने सरळ सेटमध्ये अंतिम सामना जिंकून चेन्नई खुल्या टेनिस स्पध्रेचे विजेतेपद पुन्हा आपल्याकडे राखले.
पात्रता फेरीचा अडसर पार करून अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या स्लोव्हाकियाच्या बेडेनेची घोडदौड वॉवरिन्काने रोखली. गेल्या वर्षी जागतिक टेनिस क्षेत्रात आव्हान निर्माण झालेल्या वॉवरिन्काने ही लढत ६-३, ६-४ अशा फरकाने सहज जिंकली.
वॉवरिन्काने ९० मिनिटांत अंतिम लढतीवर नाव कोरले आणि तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा चषक उंचावला. याआधी गेल्या वर्षी आणि २०११मध्ये त्याने जेतेपद पटकावले होते.

वर्षांचा प्रारंभ जेतेपदाच्या चषकासह करण्याचा आनंद खास असतो. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेतील गतविजेतेपद टिकवण्यासाठी हे अजिंक्यपद माझा आत्मविश्वास वाढवेल. जेतेपद पटकावल्याचा आनंद मला लुटायचा आहे, तसेच पुन्हा या ठिकाणी ही किमया साधण्यासाठी मी उत्सुक आहे. चेन्नईतील वातावरण अप्रतिम असते. त्यामुळेच गेली सात वष्रे येथे खेळताना मला समाधान मिळते.
-स्टॅनिसलास वॉवरिन्का