अनुभवी व गतविजेता खेळाडू स्टॅनिस्लास वॉवरिंका या स्वीस खेळाडूला चेन्नई टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी फ्रान्सच्या एडवर्ड रॉजर व्हॅसेलीनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
अग्रमानांकित वॉवरिंका विरुद्धच्या उपांत्य लढतीत व्हासेक पोस्पीसिल या कॅनडाच्या खेळाडूने दुसऱ्या सेटमध्ये पाय दुखावल्यामुळे सामना सोडून दिला. त्या वेळी वॉवरिंकाकडे ६-४, ५-५ अशी आघाडी होती. अन्य लढतीत व्हॅसेलीनने स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सवर ६-२, ४-६, ६-३ अशी मात केली.
व्हॅसेलीन व ग्रॅनोलर्स हा सामना रंगतदार झाला. पहिल्या सेटमध्ये व्हॅसेलीनने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला. त्याने परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्याला स्वत:च्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. हा सेट त्याने गमावला. तिसऱ्या सेटमध्ये व्हॅसेलीनने पुन्हा खेळावर नियंत्रण मिळवले. त्याने क्रॉसकोर्ट फटके व अचूक सव्‍‌र्हिस असा बहारदार खेळ केला आणि विजयश्री खेचून आणली.
वॉवरिंकाने व्हासेकविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये परतीच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग केला. त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवत हा सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवित ४-३ अशी आघाडी घेतली होती मात्र पुढच्या गेममध्ये त्याने सव्‍‌र्हिस गमावली. त्यानंतर दोन्ही खेळांडूंनी आपल्या सव्‍‌र्हिस राखल्या. त्यामुळे ५-५ अशी बरोबरी झाली. तथापि, व्हासेक याने सामन्यातून माघार घेत वॉवरिंकाला पुढे चाल दिली.