४ हजार कोटींचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असलेल्या बीसीसीआयचा जीव आता भांड्यात पडला आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन आयसीसीने अखेरीस पुढे ढकललं आहे. सोमवारी आयसीसीने याबद्दल अधिकृत घोषणा केली. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करता येणं शक्य होणार आहे. याआधीच आशिया चषकाचं आयोजन रद्द झाल्यामुळे बीसीसीआयसमोरचा एक अडसर दूर झाला होता.

२६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेण्यामध्ये आयसीसी चालढकल करत होतं. परंतू यजमान ऑस्ट्रेलियाने आयोजनाबद्दल असमर्थता दाखवल्यानंतर आयसीसीने अखेरीस ही स्पर्धा पुढे ढकलली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयने याआधीच तयारी सुरु केली असून यंदाची स्पर्धा युएईमध्ये भरवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. टी-२० विश्वचषाचं आयोजन अधिकृतरित्या पुढे ढकलणं जाण्यासाठी बीसीसीआय वाट पाहत होती. सोमवारी आयसीसीने ही घोषणा केल्यानंतर आता बीसीसीआयसमोरचा मार्ग मोकळा झाला आहे.

बीसीसीआयमधील सुत्रांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल अधिकृत निर्णय घेतल्यानंतर, बीसीसीआय आयपीएल आयोजनासाठी भारत सरकारकडे परवानगी मागेल. परंतू तोपर्यंत देशातली परिस्थिती न सुधारल्यास यंदाची स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येईल. याआधीही २०१४ साली आयपीएलचे काही सामने युएईमध्ये खेळवण्यात आले होते. त्यामुळे बीसीसीआय आता आयपीएलच्या आयोजनबद्दल अधिकृत घोषणा कधी करतंय याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.