ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील सर्वाधिक सुवर्णपदके ही भारताने पटकावली, पण तो इतिहास आता जुना झाला. खरेच या खेळाच्या सध्याच्या विकासावर आपण समाधानी आहोत का? एकेकाळी ऑलिम्पिक म्हणजे भारतीय हॉकी संघ, अशी ओळख आता इतिहासजमा झाली आहे. ऑलिम्पिकची पात्रता मिळवता मिळवता भारताला घाम गाळावा लागतोय, याहून दुसरी शोकांतिका असूच शकणार नाही. कसे बसे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो, तरी ७व्या किंवा ८व्या किंवा अगदी शेवटच्या स्थानावर समाधान मानून आपले ऑलिम्पिकवीर परतत आहेत, ही गेल्या काही वर्षांतील परिस्थिती. प्रशिक्षक पॉल व्हॅन अॅस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरुष हॉकी संघ २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करीत आहे. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हॉकी लीगमध्ये भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत ९व्या स्थानावर असलेल्या भारताची ही झेप निश्चितच प्रशंसनीय आहे. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकला अजून एक वर्षांचा काळ आहे आणि याच काळात अॅस यांना संघाला जेतेपदाचा दावेदार बनवण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहेत.
आव्हान खडतर असले तरी अशक्य अजिबात नाही. भारतीय पुरुष संघाने काही त्रुटींचा अभ्यास केल्यास कदाचित ते स्वप्न पूर्णही करू शकतील. सध्याच्या संघात अॅस यांनी युवा आणि अनुभवी खेळाडूंची सांगड घातलेली आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे भारताला ललित उपाध्याय, देविंदर वाल्मीकी, जसजित सिंग आणि मनप्रीत सिंग हे हिरे मिळाले आहेत, गरज आहे ती त्याला पैलू पाडण्याची. जागतिक हॉकी लीगकडे ऑलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे. २०१४मध्ये आशियाई स्पध्रेचे जेतेपद पटकावून भारताने ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती, त्यानंतरचा दोन वर्षांचा काळ हा भारताला आपल्या उणिवा भरून काढण्यासाठीच वापरायचा होता. एक वर्षांचा काळ असाच सरला आणि केवळ वर्ष राहिले आहे. त्यामुळे वेळ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती भारतासमोर आहे. जागतिक हॉकी लीगमधील कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास भारताने पाकिस्तान, मलेशिया, फ्रान्स यांना कडवी टक्कर दिली, परंतु क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि ग्रेट ब्रिटन यांच्याविरुद्ध भारताच्या उणिवा उघडय़ावर पडल्या. या संघांविरुद्ध भारताने एकूण १५ गोल पचवले, तर केवळ ३ गोल करण्यात यश मिळवले. कमकुवत बचावफळी, पेनल्टीचे गोल करण्यात येत असलेले अपयश, संवादाचा अभाव इत्यादी बाबींवर भारतीय संघाला काम करण्याची आवश्यकता आहे. भारतीय संघाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णधार सरदार सिंगचा पूर्वीचा अंदाज लीगमध्ये पाहायला मिळाला. चेंडूवर अचूक नियंत्रण आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवा देण्याच्या कौशल्यात माहीर असलेल्या सरदारची नव्याने ओळख झाली. पण पुन्हा अव्वल संघांविरुद्ध सरदार हरवलेला दिसला. त्याने केलेल्या चुकांचा फायदा प्रतिस्पर्धी सहज उचलून गोल करण्यात यशस्वी झाले. बचावफळीबाबत बोलायचे झाल्यास दिलीप तिर्की याच्या निवृत्तीनंतर भारताला मजबूत बचाव करताच आला नाही. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि ब्रिटन यांनी तर अगदी सहज भारताची बचावफळी भेदली. ही संघासाठी आणि अॅस यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. व्ही. आर. रघुनाथ आणि रुपिंदरपाल सिंग यांच्या अनुपस्थितीमुळे हे झाले, असे कारण देऊन आपण या समस्येतून हात झटकू शकतो. मात्र त्यांच्यासारखे खेळाडू तयार करण्याची जबाबदारी तितकीच वाढली आहे. मनप्रित सिंगने आपली छाप पाडली असली तरी तो एकटा प्रतिस्पध्र्याचे आक्रमण थोपवण्यात यशस्वी होणे कठीणच आहे. गोलरक्षक आर. श्रीजेशवर आपण जास्तच अवलंबून राहिलो आहोत. गेले एक वर्ष त्याने कामगिरीचा आलेख चढता ठेवला आह़े, म्हणून आपण निर्धास्त आहोत. पण पर्यायी गोलरक्षक तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे. हरजोत सिंगला दौऱ्यावर नेऊन केवळ भ्रंमती करायला लावल्यास पर्यायी गोलरक्षक तयार होणे कठीण आहे. श्रीजेशवर विसंबूत राहत आपले बाचावपटू निर्धास्त राहतात, ही बाब धोकादायक आहे.
राहता राहिली गोष्ट पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करण्याची, एके काळी भारताकडे एकाहून एक पेनल्टीतज्ज्ञ खेळाडू होते. मात्र आता भारताला १०० टक्क्यांपैकी २० ते २५ टक्केच गोल करण्यात यश मिळत आहे. हॉकी लीगमध्ये भारताला एकूण २० पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यापैकी केवळ ५ गोलमध्ये रूपांतरित झाले. हा आकडा चिंताजनक आहे. पेनल्टी कॉर्नरसाठी आखण्यात आलेल्या रणनीतीत बदल करायला हवा, इतकी साधी गोष्ट प्रशिक्षकांना कळत नसेल, ही बाब पटणारी नाही. सन्मवयाचा अभावही संघात प्रकर्षांने जाणवतो. त्यामुळे ऑलिम्पिकसाठीचे हे एक वर्ष भारतीय संघाची कसोटी पाहणारे आहे. उणिवा भरून काढल्यास भारताला यश मिळवणे कठीण जाणार नाही हे नक्की.
swades.ghanekar@expressindia.com