भारतात आयपीएलच्या सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले जात असताना दुसरीकडे क्रिकेटविश्वात दमदार आगमनाचे चीनच्या स्वप्नांचे इमले कोसळले आहेत. आयसीसी वर्ल्ड लीगच्या पात्रता फेरीतील सामन्यांत सौदी संघाच्या विरोधात खेळणाऱ्या चीन संघाचा अक्षरशः धुव्वा उडाला. चीनचा आख्खा संघ अवघ्या २८ धावांत आटोपला. ५० षटकांच्या या सामन्यात चीनला सौदीविरोधात तब्बल ३९० धावांनी पराभूत व्हावं लागलं.

थायलंडमध्ये आयसीसी वर्ल्ड लीग सुरू आहे. या स्पर्धेत यजमान थायलंडसह भूतान, बहारिन, कुवैत, कतार यांच्यासह सौदी आणि चीनच्या संघांनी सहभाग घेतला आहे. थायलंडमधील चियांग माईतील जिमखाना क्लबमध्ये चीन आणि सौदी या दोन संघांत पात्रता फेरीतील सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सौदीच्या संघाने ५० षटकांत ४१८ धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान घेऊन चीनचा संघ मैदानावर उतरला. मात्र, चीनच्या एकेक फलंदाजाने सौदीच्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर अक्षरशः नांगी टाकली. १२.४ षटकांत अवघ्या २८ धावांमध्ये संघाचा डाव आटोपला. चीनचा ३९० धावांनी पराभव झाला. चीनच्या संघातील ७ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. इतर तीन फलंदाजांनी अनुक्रमे ३, ३ आणि नाबाद ६ धावा केल्या. विशेष म्हणजे या डावात चीनला १३ धावा अवांतर मिळाल्या होत्या.

याआधी २००७ मध्ये बारबादोसविरोधात खेळताना वेस्टइंडिजच्या १९ वर्षांखालील संघाचा डाव ५० षटकांमध्ये अवघ्या १८ धावांमध्येच आटोपला होता. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००४ मध्ये श्रीलंकेच्या संघाने झिम्बॉम्बेच्या संघाचा ३५ धावांमध्ये खुर्दा उडवला होता.