29 September 2020

News Flash

करोनाशी लढा : आपण यावरही मात करु, फक्त परिस्थितीचं गांभीर्य ओळखा – लक्ष्मीपती बालाजी

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले सल्ले ऐका !

देशभरात पसरलेल्या करोना विषाणूशी लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरिने प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. सध्याच्या काळात वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. वैद्यकीय सेवेत कोणतीही कसर राहू नये यासाठी पंतप्रधान आणि प्रत्येक राज्य सरकारने विशेष सहायता निधी खातं सुरु केलं आहे. देशातील अनेक उद्योगपती, खेळाडू, बॉलिवूड सेलिब्रेटी या संकटकाळात आपलं सामाजिक कर्तव्य बजावण्यासाठी पुढे आले आहेत. भारताचा माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने, आपण करोनावरही मात करु, फक्त सर्वांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

“सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करु अशा प्रकारची आपली जडणघडण झाली आहे. आपल्या पुर्वजांनी याआधी अशा अनेक रोगांचा सामना केला आहे. आपले पालकही यापेक्षा खडतर काळातून गेले आहेत. आपणही अशी अनेक संकटं झेलली आहेत, २००४ साली त्सुनामी, चेन्नईतला पूर ही त्याची काही उदाहरणं आहेत. लोकं एकत्र येत आहेत. परस्परांमधील विरोध विसरुन देश एकमेकांना मदत करतायत. आपण सर्वांनी वेळेचा आदर केला पाहिजे, आता आपण करायचं काय असा विचार केला तर सर्वांना कठीण जाईल. आपण सध्या कठीण काळातून जातोय, हे सर्वांनी मान्य करायला हवं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखणं गरजेचं आहे. सर्वांनी स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. आपल्याला साधा ताप आला तरीही आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. करोना हे जगावर आलेलं संकट आहे…अशा परिस्थितीत आपण डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी काय सांगत आहेत हे ऐकलचं पाहिजे.” बालाजी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

आपल्या कारकिर्दीत बालाजीने आपल्या भन्नाट माऱ्याने स्वतःचं नाव तयार केलं होतं. पाकिस्तानविरोधातील सामन्यात भन्नाट यॉर्कर चेंडूवर पाकिस्तानी फलंदाजांचे उडवलेले त्रिफळे हे आजही इंटरनेटवर प्रसिद्ध आहेत. दुखापतींमुळे बालाजीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फारशी बहरु शकली नाही. निवृत्तीनंतर बालाजी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज या संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 11:35 am

Web Title: we are designed to survive accepting reality important says lakshmipathy balaji on covid 19 crisis psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत??
2 डाव मांडियेला : शतकी ठेका
3 भारतीय क्रिकेटपटूंसाठी ‘विश्रांती स्वागतार्ह’!
Just Now!
X