‘‘पुरुष क्रिकेटपटूंना जेवढे वलय, पैसा, प्रसिद्धी मिळते ना, ती आपल्या वाटय़ाला यापूर्वी कधीच आली नव्हती. आमचा सामना पाहायला फक्त घरची मंडळी यायची. श्रीलंकेतल्या सामान्य प्रेक्षकांनीही कधी वेळ काढून आमचा सामना पाहिला नव्हता. पण विश्वचषकामुळे आमचे आयुष्यच बदलून गेले आहे. विश्वचषक तमाम क्रिकेटविश्वात पाहिला जातोय, त्यामुळे बऱ्याच देशांमधून आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया मिळतायत, इतिहासात पहिल्यांदाच ‘सुपर-सिक्स’मध्ये पोहोचल्याने श्रीलंकेतून जबरदस्त पाठिंबा मिळतोय, या विश्वचषकामुळे आम्ही खऱ्या अर्थाने नावारूपाला आलो, यापुढेही देशाची मान उंचावेल असेच माझे प्रयत्न असतील,’’ असे श्रीलंकेची अष्टपैलू क्रिकेटपटू इशानी कौशल्याने सांगितले.
कौशल्या एक धडाकेबाज फलंदाज असून गोलंदाजीच्या सारथ्याची जबाबदारीही तिच्यावर असते. या विश्वचषकात दोन अर्धशतकांसह ६ बळी तिच्या नावावर आहेत. या विश्वचषकातील धडाकेबाज फलंदाजीसाठी काही विशेष प्रयत्न घेतलेस का, असे विचारल्यावर कौशल्या म्हणाली की, ‘‘विश्वचषक क्रिकेटपटूच्या आयुष्यातली सर्वात मोठी स्पर्धा असते, त्यासाठी मीसुद्धा विशेष तयारी केली होती. मानसिक संतुलनासाठी मी योगा करायला लागले, तर प्रत्येक दिवशी दोन तास अधिक सरावाला दिले. जोरकस फटके मारता यावेत यासाठी मी व्यायामशाळेतही अधिक वेळ घालविला.’’
या विश्वचषकातील कामगिरीबद्दल विचारले असता कौशल्या म्हणाली की, ‘‘आमचा आतापर्यंतचा प्रवास हा स्वप्नवत असाच आहे. कारण १८ सामन्यांत पहिल्यांदाच आम्ही भारताला पराभूत केले. इंग्लंडसारख्या बलवान संघाला आम्ही पराभूत करू शकलो. पहिल्यांदाच ‘सुपर-सिक्स’मध्ये पोहोचल्याने संघातही आनंदाचं वातावरण आहे. आमच्या राष्ट्राध्यक्षांनीही या विजयाची दखल घेतल्याने आम्ही सारेच भारावून गेलो आहोत. या विश्वचषकाने आमचे आयुष्य खऱ्या अर्थाने बदलले आहे.’’आगामी ध्येयांबद्दल कौशल्या म्हणाली की, ‘‘सध्या माझे आणि संघाचे ध्येय फक्त विश्वचषकच आहे. पहिल्यांदा ‘सुपर-सिक्स’मध्ये पोहोचलो असलो तरी या आनंदात आम्ही बेभान झालेलो नाही. आता यापुढे अंतिम फेरीत कसे पोहोचता येईल, याचाच विचार आम्ही करीत आहोत. वैयक्तिक ध्येयांबद्दल म्हणाल तर माझ्याकडून चांगली कामगिरी व्हावी आणि संघाच्या विजयात हातभार लागावा, हेच कायम ध्येय माझे असेल. या विश्वचषकामुळे चांगले नाव झाले आहे, हेच नाव जपण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल.’’