ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पराभवाचे खापर खेळपट्टी किंवा दव यावर न फोडता ऑस्ट्रेलिया संघ या विजयासाठी पात्रच होता, असे म्हटले आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात कोणाला स्थान द्यायचे याबाबत संभ्रम नाही. आता संघातील एका जागेबाबतच निर्णय घ्यायचा आहे, असे कोहलीने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला 3-2 असा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे कौतुक केले. ऑस्ट्रेलिया संघ या विजयासाठी पात्र होता, असे त्याने सांगितले. वर्ल्ड कपमधील संघाबाबतही त्याने भाष्य केले. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कोणाला स्थान द्यायचे, याबाबत संभ्रम नाही. आम्हाला नेमके काय करायचे आहे, याची कल्पना आम्हाला आहे, असे त्याने सांगितले.

मालिकेत रोहित शर्मा, शिखर धवन या सलामीवीरांसह केदार जाधव आणि विराट कोहली हे पाचही सामने खेळले. विजय शंकरलाही पाचही सामन्यात संधी मिळाली. पण लोकेश राहुलला फक्त एका सामन्यात, रिषभ पंतला दोन तर अंबाती रायडूला तीन सामन्यांमध्ये संधी मिळाली. याबाबत कोहली म्हणतो, काही खेळाडूंना जास्त सामन्यात खेळवता आले नाही, ही आमच्यासाठी चिंतेची बाब नाही. आम्हाला संघनिवडीबाबत संभ्रम नाही. आता आम्हाला संघातील 11 पैकी एका जागेबाबत निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक खेळाडूकडे जबाबदारी सोपवून मैदानात तो दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये आम्ही बदल केले. मालिकेत संधी न मिळालेल्यांना मैदानात पाठवून ते कोणत्या परिस्थितीत कशी कामगिरी करतात हे आम्हाला बघायचे होते, असे त्याने सांगितले.

तुर्तास वर्ल्ड कपमध्ये सर्वच संघांना समान संधी असल्याचे वाटते, असेही कोहली सांगतो. वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे सद्य कामगिरीवरुन बलशाली दिसत आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघ देखील संतुलित दिसतोय. पाकिस्तानचा संघ सामन्याच्या दिवशी कोणाचाही पराभव करु शकतो. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये तुम्ही कोणत्या मानसिकतेने जात आहात, हे महत्त्वाचे ठरते, असे त्याने सांगितले.