वेस्ट इंडिजचा ४८ धावांनी न्यूझीलंडवर विजय
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा
‘आम्हाला लिंबू-टिंबू समजत असाल तर ती तुमची घोडचूक ठरेल,’ असा संदेश वेस्ट इंडिजने ‘सुपर-सिक्स’च्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करताना दिला. विश्वचषकात न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडपाठोपाठचा ‘दादा’ संघ समजला जात होता, त्यामुळे वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला ४८ धावांनी पराभूत करत सर्वानाच धक्का देत ‘हम किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने न्यूझीलंडपुढे २०८ धावांचे आव्हान ठेवले होते. भेदक आणि अचूक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला ४८ धावांनी पराभूत करत ‘सुपर सिक्स’ गटामध्ये दुसरा क्रमांक गाठला आहे.
नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी पाचारण करत त्यांची २ बाद २८ अशी अवस्था केली, पण त्यानंतर स्टेफनी टेलरने (४९) संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण ती अर्धशतकाला एक धाव हवी असताना बाद झाली. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाला घरघर लागली आणि त्यांची ८ बाद १५९ अशी अवस्था झाली. या वेळी शानेल डेली (३७), अनिसा मोहम्मद (नाबाद ३१) यांनी नवव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी रचत संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला.
२०८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे ठरावीक फरकाने फलंदाज बाद होत गेले. कर्णधार सुझी बेट्स (३०) आणि रचेल प्रिएस्ट (३६) यांना संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीपुढे त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : ५० षटकांत ९ बाद २०७ (स्टेफनी टेलर ४९, शानेल डेली ३७, अनिसा मोहम्मद नाबाद ३१; मोर्ना निल्सन ३/२७) विजयी वि. न्यूझीलंड : ४४.३ षटकांत सर्वबाद १५९ (रचेल प्रिएस्ट ३६, सुझी बेट्स ३०; त्रेमायने स्मार्ट ३/३९), सामनावीर : अनिसा मोहम्मद.