18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

घरच्या मैदानावर आम्हीच शेर!

इंग्लिश भूमीवर सपाटून मार खाणाऱ्या भारतीय संघाने घरच्या मैदानावर आम्हीच शेर आहोत, हे पुन्हा

पी.टी.आय., अहमदाबाद | Updated: November 20, 2012 4:36 AM

इंग्लिश भूमीवर सपाटून मार खाणाऱ्या भारतीय संघाने घरच्या मैदानावर आम्हीच शेर आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्सनी धूळ चारून भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत विजयाची बोहनी केली. विजयासाठीचे इंग्लंडचे ७७ धावांचे आव्हान भारताने अखेरच्या दिवशी उपाहारानंतर एका विकेटच्या मोबदल्यात पार केले आणि या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
मोटेराच्या तडा गेलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडचे आव्हान पार करून सात वर्षांनी पहिला विजय साकारण्यासाठी भारताला अवघी १६.३ षटके लागली. पहिल्या डावातील द्विशतकवीर चेतेश्वर पुजारा आणि शतकवीर वीरेंद्र सेहवाग यांनी आक्रमक फलंदाजी करत पहिल्या १० षटकांत ५७ धावा जोडल्या. सेहवाग (२५) बाद झाल्यानंतर पुजाराने विराट कोहलीसह कोणतीही पडझड होऊ न देता भारताला विजय मिळवून दिला. नाबाद २०६ आणि नाबाद ४१ धावांची खेळी करणारा पुजारा सामन्यात सर्वोत्तम ठरला.
तत्पूर्वी, प्रग्यान ओझाने आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: नाचवले. त्यामुळे विजयपथातील सर्व अडथळे दूर करत ओझाने भारतासाठी विजयाची दारे खुली केली. कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक (१७६) आणि मॅट प्रायर या मैदानावर स्थिरावलेल्या फलंदाजांना १२ चेंडूंच्या फरकाने माघारी पाठवत भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या. कुक आणि प्रायर यांनी चौथ्या दिवशी मैदानावर ठाण मांडून इंग्लंडचा डावाने पराभव टाळला होता, तसेच सामना अनिर्णित राखण्याच्या दिशेनेही त्यांनी दमदार पाऊल टाकले होते, पण ओझाने या दोघांनाही माघारी पाठवले, तसेच उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि झहीर खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवल्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव कालच्या ५ बाद ३५६ वरून सोमवारी १६ षटकांत ४०६ धावांवर आटोपला. पाहुण्यांनी उर्वरित पाच फलंदाज अवघ्या ६६ धावांत गमावले. ओझाने दुसऱ्या डावात १२० धावांत ४ बळी मिळवले.
गौतम गंभीरच्या जागी सलामीला उतरलेल्या पुजाराने दुसऱ्या डावातही आश्वासक सुरुवात केली. सेहवागने इंग्लिश गोलंदाजांवर हल्ला चढवला. पुजाराचीही त्याला चांगली साथ मिळत होती, पण २१ चेंडूंत एक चौकार आणि एक षटकार लगावणारा सेहवाग ग्रॅमी स्वानच्या गोलंदाजीवर लाँगऑनला केव्हिन पीटरसनकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर पुजारा आणि कोहलीने २३ धावांची भर टाकली. कोहलीने स्वानला चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पुजारा ४१ धावांवर नाबाद राहिला. मोटेरावरील भारताचा हा १२ सामन्यांतील चौथा विजय ठरला. मायदेशात गेल्या सहापैकी पाच सामन्यांत विजय मिळवण्याची करामत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने केली. आता दोन्ही संघ २३ नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मुंबईला रवाना होतील.    

धावफलक
भारत (पहिला डाव) : ८ बाद ५२१ (डाव घोषित).
इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद १९१
इंग्लंड (दुसरा डाव) : अ‍ॅलिस्टर कुक त्रि. गो. ओझा १७६, निक कॉम्प्टन पायचीत गो. झहीर खान ३७, जोनाथन ट्रॉट झे. धोनी गो. ओझा १७, केव्हिन पीटरसन त्रिफळा गो. ओझा २, इयान बेल पायचीत गो. यादव २२, समित पटेल पायचीत गो. यादव ०, मॅट प्रायर झे. आणि गो. ओझा ९१, टिम ब्रेस्नन झे. बदली गो. झहीर खान २०, स्टुअर्ट ब्रॉड झे. आणि गो. यादव ३, ग्रॅमी स्वान त्रि. गो. अश्विन १७, जेम्स अँडरसन नाबाद ०, अवांतर २१, एकूण १५४.३ षटकांत सर्व बाद ४०६.
बादक्रम : १-१२३, २-१५६, ३-१६०, ४-१९९, ५-१९९, ६-३५६, ७-३६५, ८-३७८, ९-४०६, १०-४०६.
गोलंदाजी : उमेश यादव २३-२-७०-३, प्रग्यान ओझा ५५-१६-१२०-४, आर. अश्विन ४३-९-१११-१, वीरेंद्र सेहवाग १-०-१-०, झहीर खान २७.३-५-५९-२, सचिन तेंडुलकर १-०-८-०, युवराज सिंग ४-०-१७-०.
भारत (दुसरा डाव) : वीरेंद्र सेहवाग झे. पीटरसन गो. स्वान २५, चेतेश्वर पुजारा नाबाद ४१, विराट कोहली नाबाद १४, अवांतर ०, एकूण १५.३ षटकांत १ बाद ८०.
बाद क्रम : १-५७.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन २-०-१०-०, ग्रॅमी स्वान ७.३-१-४६-१, समित पटेल ६-०-२४-०.
सामनावीर : चेतेश्वर पुजारा (भारत).    

First Published on November 20, 2012 4:36 am

Web Title: we are tigers