ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. साखळी फेरीपर्यंत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला अंतिम सामन्यात सपशेल अपयशी ठरल्या. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं १८५ धावांचं आव्हान भारतीय महिलांना पेलवलं नाही. अवघ्या ९९ धावांत भारताचा डाव गडगडला आणि ८५ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावलं. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय क्षेत्ररक्षकांनी अनेक जिवदान दिली. शफाली वर्माने पहिल्याच षटकात एलिसा हेलीचा झेल सोडला, याच एलिसा हेलीने नंतर फटकेबाजी करत भारतीय महिलांना सळो की पळो करुन सोडलं. यानंतर फलंदाजीतली शफाली अंतिम सामन्यात अपयशी ठरली. पहिल्याच षटकात ती माघारी परतली. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरने १६ वर्षीय शफालीची पाठराखण केली असून, या पराभवासाठी तिला जबाबदार धरता येणार नाही असं म्हटलं आहे.

“शफाली अवघ्या १६ वर्षाची आहे, तिची पहिली विश्वचषक स्पर्धा आहे. तिने भारतीय संघासाठी खरंच चांगली कामगिरी केली आहे. १६ व्या वर्षी सतत सकारात्मक राहणं आणि अंतिम सामन्याच्या दबावाखाली चांगला खेळ करणं ही सोपी गोष्ट नाही. तिच्यासाठी हा एक चांगला धडा होता, असं कोणासोबतही घडू शकतो. या पराभवासाठी तिला जबाबदार धरता येणार नाही, कारण कधीकाळी आम्हीदेखील तिच्या जागेवर होतो. चांगली सुरुवात करण्याची संधी आम्ही दवडली, आणि त्यानंतर गोलंदाजांना पुनरागमन करणं कठीण होऊन बसलं”,हरमनप्रीतने सामना संपल्यानंतर आपलं मत मांडलं.

दरम्यान, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात करत ५ षटकांत ४७ धावा ठोकल्या. क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेली हिने ३० चेंडूत धमाकेदार अर्धशतक ठोकले. तिने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याच सामन्यात तिने २ हजार टी२० धावांचा टप्पादेखील गाठला. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या.

धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले. तुफान फटकेबाजी सुरू असताना दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी टिपले. आधी कर्णधार मेग लॅनिंग १६ धावांवर बाद झाली. पाठोपाठ गार्डनरही २ धावांत माघारी परतली. पण बेथ मूनीने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावसंख्या गाठून दिली. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्यात प्रचंड धावा खर्च केल्या.