भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची स्पष्टोक्ती

विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा

कोलकाता : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आम्ही आमच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकलो नाही. त्याशिवाय स्टेडियममधील उपस्थित चाहत्यांच्या पाठिंब्याला आम्ही पूर्णपणे न्याय देऊ शकलो नाही, अशी खंत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने बुधवारी व्यक्त केली.

मंगळवारी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात भारताने बांगलादेशला १-१ असे बरोबरीत रोखले. परंतु क्रमवारीत भारतापेक्षाही ८३ स्थानांनी मागे असलेल्या बांगलादेशविरुद्ध चाहत्यांना दमदार विजयाची अपेक्षा होती. त्यामुळेच छेत्रीने चाहत्यांची माफीही मागितली.

‘‘आम्ही चाहत्यांनी दिलेल्या पाठिब्यांला साजेसा खेळ करू शकलो नाही. आमच्या ड्रेसिंग रूममध्येही त्यामुळे फार निराशेचे वातावरण होते. परंतु चाहत्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शवल्यामुळे त्यांचे मनापासून आभार,’’ असे ३५ वर्षीय छेत्री म्हणाला.

‘‘आम्ही गोल करण्याची संधी अनेकदा दवडली. परंतु या लढतीतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेषत: आमच्या बचावफळीने मध्यंतरानंतर दमदार कामगिरी केली. तुम्ही जर अशाचप्रकारे आमच्या प्रत्येक सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिलात, तर निश्चित आम्ही आमच्या खेळाचा दर्जा अधिक उंचावू,’’ असेही छेत्रीने सांगितले.

भारताने सप्टेंबर महिन्यात झालेल्या यापूर्वीच्या सामन्यात आशियाई विजेत्या कतारला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. तर ओमानविरुद्ध त्यांना १-२ असा पराभव पत्करावा लागला होता.

आमच्या खेळाडूंची गोल करण्याची क्षमता या सामन्याद्वारे स्पष्ट झाली. मध्यंतरापूर्वी आम्ही बांगलादेशला सहज गोल करू दिला. तर उत्तरार्धात तीन-चार वेळा आम्हाला गोलने हुलकावणी दिली. त्यामुळे बांगलादेशचा गोलरक्षक माझ्यासाठी सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी आहे.

– इगॉर स्टिमॅच,  भारताचे प्रशिक्षक