२०१९ हे वर्ष भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी अतिशय चांगलं गेलं आहे. कर्णधार या नात्याने विराटने भारतीय संघाला अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये आणि मालिकांमध्ये विजय मिळवून दिला. वर्षाअखेरीस विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले. वन-डे, टी-२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. भारतीय संघाचे माजी निवड समिती प्रमुख कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी कोहलीच्या यशाचं श्रेय घेतलं आहे.

जाणून घ्या काय म्हणाले श्रीकांत??

“२००८ साली मी निवड समितीचा प्रमुख म्हणून काम करायला सुरुवात केली, २०११ विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघ बांधणं हे माझं त्यावेळचं ध्येय होतं. महेंद्रसिंह धोनीसारखा कर्णधार संघात होता, सर्व गोष्टी जुळून आल्या आणि आम्ही घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकलो. माझ्या आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा क्षण होता. खेळाडू आणि निवड समिती प्रमुख म्हणून विश्वचषक विजयात आपला सहभाग असणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मला हे देखील सांगायला आवडेल, की माझ्या समितीने विराट कोहलीला त्या काळात अधिक खुलून खेळण्याची संधी दिली, आज तो कशी कामगिरी करतोय हे आपण सर्व पाहतच आहोत”, श्रीकांत टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलत होते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ५ जानेवारीपासून भारतीय संघ श्रीलंकेविरोधात टी-२० मालिकेला सुरुवात करेल. नवीन वर्षातली घरच्या मैदानावरची भारतीय संघाची ही पहिलीच मालिका असणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध विराटसेना ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होईल. त्यामुळे या सर्व मालिकांमध्ये विराटची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – …नाहीतर माझं काही खरं नाही ! टीम इंडियाच्या गोलंदाजाला सतावतेय चिंता