अ‍ॅशेस विजयाच्या जल्लोषानंतर उन्मादात ओव्हलच्या खेळपट्टीवर केलेल्या मूत्रविसर्जनाच्या घृणास्पद प्रकाराने इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी साऱ्या क्रिकेट जगताची शरमेने मान खाली झुकवली होती. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना आपण केलेल्या कृत्याची जाणीव झाली असून त्यांच्या संघाने याप्रकरणी अखेर माफी मागितली आहे.
‘‘एक संघ म्हणून आम्हाला आमचा अभिमान आहे. ज्या प्रतिस्पध्र्याबरोबर आम्ही खेळलो तेदेखील आमचा आदर करतात. अ‍ॅशेससारखी मानाची मालिका जिंकल्याचा परम आनंद आम्हाला झाला होता. पण सामन्यानंतर मैदानात जो काही प्रकार घडला तो अयोग्य होता आणि त्या कृत्याची आम्ही माफी मागत आहोत,’’ असे इंग्लंड संघाने पत्रकात म्हटले आहे.
ओव्हल मैदानात अ‍ॅशेस मालिका जिंकल्यावर इंग्लंडचा संघ मद्यपान करण्यासाठी बसला होता. त्या वेळी इंग्लंडच्या केव्हिन पीटरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी ओव्हलच्या खेळपट्टीवर लघुशंका केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांनी केला होता.
‘‘खेळाडूंचा कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नव्हता. जर काही जणांना आम्ही अपराध केल्याचे वाटत असेल तर आम्ही त्यांची माफी मागतो. ही खेळाडूंकडून झालेली साधी चूक असून यापेक्षा जास्त काहीच नाही,’’ असेही पत्रकात म्हटले आहे.