भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या याने न्यूझीलंडविरुद्धच्या धरमशाला येथील सामन्यात तीन विकेट्स घेतल्या. हार्दिकच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्याला पदार्पणाच्या सामन्यातच सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला. हार्दिक एकदिवसीय सामन्यात एक वेगवान गोलंदाज म्हणून कितपत चांगली कामगिरी करेल याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली होती. मात्र, हार्दिकने उमेश यादवच्या साथीने चांगली कामगिरी केली. हार्दिकच्या गोलंदाजीचे सर्वांनी कौतुक केले. संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीही हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हार्दिक हा आमच्यासाठी असा खेळाडू आहे, की ज्याला आम्ही केवळ मैदानात जाऊन त्याला हवी तशी मनसोक्त गोलंदाजी करायला सांगितली. हार्दिकला गोलंदाजीत पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. कोणताही दबाव त्याच्यावर नसल्याने त्याने चांगली कामगिरी केली, असे अनिल कुंबळे म्हणाले. यासोबतच हार्दिक पंड्या करिअरच्या अशा टप्प्यावर आहे की त्याला स्वातंत्र्य द्यायला हवे, असेही कुंबळे पुढे म्हणाले.