विश्वचषकाची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाताना भारताचा कर्णधार विराट कोहलीचे हौसले बुलंद होते. आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळून आम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत धूळ चारू, असा आत्मविश्वास कोहलीने व्यक्त केला आहे.
‘‘आम्हाला आमच्या गुणवत्तेबरोबरच कसोटी संघातील खेळाडूंवर विश्वास आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन खेळण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक आहोत. तिथल्या वातावरणाशी जुळवून घेऊन आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असे कोहली म्हणाला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनी खेळू शकणार नसल्याने कोहलीकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. धोनीच्या उजव्या हाताच्या अंगठय़ाला दुखापत झाली असून तो १२-१६ डिसेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या अ‍ॅडलेड येथील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये संघात पुनरागमन करणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना २६-३० डिसेंबरमध्ये मेलबर्न आणि चौथा कसोटी सामना ३-७ जानेवारीमध्ये सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.
‘‘या दौऱ्यामध्ये आक्रमक आणि सकारात्मक खेळण्यावर आमचा भर असेल. या दौऱ्यासाठी आम्ही खास रणनीती आखली आहे. पण फक्त एकाच रणनीतीवर आम्ही अवलंबून नाही. वेगवेगळे पर्याय आम्ही यासाठी खुले ठेवले आहेत,’’ असे कोहली म्हणाला.