नवीन वर्षात भारतीय संघासमोर महत्वाचं आव्हान असणार आहे ते ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं. या स्पर्धेआधी भारतीय संघाला सराव म्हणून फार कमी सामने मिळणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीला भारताने श्रीलंकेवर टी-२० मालिकेत २-० ने मात केली. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतही भारताने चांगली सुरुवात केली आहे. पण विश्वचषक संघात कोणत्या खेळाडूला संधी मिळणार यावरुन चर्चांना उधाण आलेलं आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे.

“शेवटच्या क्षणापर्यंत काही बदल हे होत राहतील. पण माझ्या आणि संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून, विश्वचषकासाठी भारताचा संघ आता तयार झाला आहे. आमचा संघ काय असणार आहे, याची आम्हाला कल्पना आहे. आता एखादा खेळाडू आपला फॉर्म हरवून बसला किंवा एखाद्या खेळाडूला दुखापत झाली….तरच संघात बदल अपेक्षित आहेत. नाहीतर संघात फार बदल होणार नाहीत”, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्याआधी राठोड पत्रकारांशी बोलत होते.

अवश्य वाचा – हार्दिकचं भारतीय संघातलं पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता

दरम्यान, पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत न्यूझीलंडला चारीमुंड्या चीत केलं. विशेषकरुन गोलंदाज आणि फलंदाजीत लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांची कामगिरी वाखणण्याजोगी होती. आगामी सामन्यात भारतीय संघ जिंकल्यास, मालिका विजयाची सुवर्णसंधी संघाकडे असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.