करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसी आणि अनेक क्रिकेट बोर्ड प्रेक्षकांविना सामने खेळवण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अद्याप याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून, बीसीसीआय देशात क्रिकेटची बंद पडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यात तिरंगी मालिका खेळण्याचं निमंत्रण दिलं होतं. बांगलादेशच्या संघही या मालिकेत सहभागी होणं श्रीलंकेला अपेक्षित आहे. श्रीलंकेनंतर आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डही भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आफ्रिका दौरा करेल यासाठी आशादायी आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हंगामी कार्यकारी अध्यक्ष जॅक फॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दौऱ्याबद्दल क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय या दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरु असल्याचं फॉल म्हणाले. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने कोणताही शब्द दिलेला नसल्याचं खजिनदार अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केलंय. “करोनामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वन-डे मालिका रद्द करावी लागली होती. त्यावेळी भविष्यात शक्य झाल्यास आम्ही दक्षिण आफ्रिकेचा दौरा करण्याचा प्रयत्न करु असं म्हणालो होतो. यासंदर्भात चर्चाही झालेली होती. परंतू यात आम्ही ऑगस्ट महिन्यात आफ्रिकेचा दौरा करुच असा कोणताही शब्द दिलेला नव्हता.” धुमाळ यांनी पीटीआयशी बोलताना माहिती दिली.

जोपर्यंत केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी उठवत नाही, तोपर्यंत बीसीसीआय कोणत्याही देशाचा दौरा करण्याबाबत अधिकृत निर्णय घेऊ शकत नसल्याचं धुमाळ यांनी स्पष्ट केलं. “जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आणि त्यानंतर झिम्बाब्वेला जाणं अपेक्षित आहे…परंतू तो दौराही पूर्ण होईल याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. हे दोन्ही दौरे आयसीसीने आखून दिलेले आहेत, हे दौरे पूर्ण होतील की नाही याबद्दल आमच्या मनात शंका आहे. तर ऑगस्ट महिन्यात आफ्रिका दौऱ्याबद्दल आम्ही कसा निर्णय घेऊ शकतो??” धुमाळ यांनी बीसीसीआयची बाजू मांडली.