क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिल देव यांचे मत

कोलकाता : महान खेळाडू कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. मात्र प्रशिक्षक निवडताना कर्णधार विराट कोहलीच्या मताचा आदर राखू, या समितीतील सदस्या शांता रंगास्वामी यांच्या मताशी कपिल यांनीही सहमती दर्शवली.

‘‘सर्वाच्या मताप्रमाणेच प्रशिक्षकाची निवड करताना कोहलीच्या मताचाही आदर राखला जाईल. प्रशिक्षक निवडणे फार कठीण नाही. त्यासाठी फक्त आम्हाला आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल,’’ असे कपिलदेव यांनी सांगितले.

विराट कोहलीचे मत ध्यानात घेतले जाईल. मात्र प्रशिक्षकाच्या नावावर अंतिम मोहोर उमटवणे हा आमचा तिघांचा सांघिक निर्णय असेल. नव्या प्रशिक्षकाचा अनुभव, क्षमता, रणनीतीकार या सर्व अंगांनी विचार केला जाईल, असे शांता रंगास्वामी म्हणाल्या.