विराट कोहलीच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील आक्रमकतेविषयी आम्ही कोणतीच चिंता बाळगत नाही. कारण आम्ही कोहलीविरुद्ध अद्याप शेरेबाजीला सुरुवात कुठे केली आहे, असा सवाल ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी केला आहे.
मेलबर्नच्या तिसऱ्या कसोटीनंतर महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर सिडनी येथे ६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीसाठी कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
कोहलीने मेलबर्नवर मिचेल जॉन्सनला जशास तसे उत्तर देऊन भारतीयसुद्धा शेरेबाजीत मागे नाहीत, याचा प्रत्यय घडवला. याबाबत लेहमन म्हणाला की, ‘‘आम्ही अद्याप कोहलीविरुद्ध शेरेबाजीला सुरुवातच केलेली नाही.’’
हसत दिलेल्या उत्तरानंतर लेहमन गंभीर होत म्हणाले, ‘‘ही मालिका अतिशय रोमहर्षक होत आहे. जोवर ती मैदानावर सुरू आहे, तोवर चिंता नाही. दोन्ही संघ गांभीर्याने क्रिकेट खेळत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. दिवसभराच्या ९० षटकांच्या खेळात खेळाडूंना खेळाकडे लक्ष केंद्रित करायचा असतो. त्यामुळे या गोष्टी घडतच राहतील. ही मालिका आव्हानात्मक, स्पर्धात्मक वातावरणात घडत आहे.’’
मेलबर्नवरील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पाचव्या दिवशी डाव घोषित करण्यास विलंब केल्यामुळे ही कसोटी अनिर्णीत राहिली, याबाबत होणारी टीका लेहमन यांनी खोडून काढली. ते म्हणाले, ‘‘आम्ही मालिका जिंकली, हे त्या दिवशी आमच्यासाठी महत्त्वाचे ठरले. परंतु आम्ही खरेच बचावात्मक पवित्रा स्वीकारला होता की भारताने बचावात्मक रणनीती स्वीकारली, हे पाहावे.’’