आयपीएल सामन्यादरम्यान भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी विराट कोहलीच्या खराब कामगिरीचं विश्लेषण करताना, अनुष्का शर्माचा उल्लेख केल्यामुळे काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेकांनी गावसकांवर टीका करत त्यांची कॉमेंट्री पॅनलमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली. याप्रकरणी अनुष्कानेही आपली प्रतिक्रिया दिली होती. सुनिल गावसकर यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत अर्थाचा अनर्थ केल्याचं सांगितलं. ज्यापद्धतीने सोशल मीडियावर काही युजर्स हे गावसकरांवर टीका करत आहेत. त्याचप्रमाणे काही माजी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी गावसकरांच्या बाजूने उतरले आहेत.

भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी गावसकरांना आपला पाठींबा दर्शवला आहे. “आम्हा, भारतीयांमध्ये विनोदबुद्धी जरा कमीच असते. जर सुनिल गावसकर खरंच विराट-अनुष्काबद्दल असं काही म्हणाला असेल तर तो नक्कीच गमतीत म्हणाला असणार. त्याच्या बोलण्यात कोणावरही टीका करण्याचा हेतू नक्कीच नसेल. मी सुनिलला चांगलं ओळखतो, तो असं वक्तव्य कधीच करणार नाही.” Pakistan Observer शी बोलत असताना इंजिनीअर यांनी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – BLOG : समालोचकांवर ‘ट्रोल’धाड

वर्षभरापूर्वी फारुख इंजिनीअर यांनाही अशाच पद्धतीने अनुष्का शर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. निवड समितीचे सदस्य हे इंग्लंडमध्ये अनुष्का शर्माला चहा देण्यात व्यस्त होते असं वक्तव्य इंजिनीअर यांनी केलं होतं. त्या प्रकरणातही लोकांनी माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढत वाद वाढवसा ज्यामुळे अनुष्काला तिचं म्हणणं मांडावं लागलं अशी बाजू इंजिनीअर यांनी मांडली.