न्यूझीलंडमधील हॉवके चषक स्पर्धेत आम्हाला सातवे स्थान मिळाले असले तरी या स्पर्धेतील अनुभवाद्वारे आम्हाला खूप काही सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या, असे भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार रितू राणी हिने सांगितले. ‘‘या स्पर्धेत आम्हाला जगातील अनेक सर्वोत्तम संघांविरुद्ध लढत द्यावी लागली. या संघांमधील खेळाडू अनुभवाबाबत आमच्यापेक्षा खूपच वरचढ असल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले आहे. विशेषत: आमच्या खेळात कोणत्या उणिवा आहेत व त्यांच्यावर मात कशी करावयाची हे आम्ही शिकलो. त्याचा उपयोग आम्हाला भविष्यकाळातील स्पर्धासाठी होणार आहे. गोल करण्याच्या संधीचे गोलात रूपांतर करण्यात आम्ही कमी पडलो. आता अशा संधीचा फायदा कसा घ्यावयाचा हे आम्ही राष्ट्रीय शिबिरात शिकणार आहोत,’’ असे रितूने सांगितले.