बाद फेरीच्या सामन्यात चिलीविरुद्ध चित्तथरारक विजय प्राप्त केल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतील कोलंबियाविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझील संघाच्या कामगिरीत आणखी सुधारणेची गरज असल्याचे मत संघाचे प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी यांनी व्यक्त केले आहे.
स्कोलारी म्हणाले की, मागील सामन्यात आम्ही कसे जिंकलो, का जिंकलो? यातील परिस्थितींचा अभ्यास करून संघात सुधारणा करण्यावर भर देणार आहोत. जेणेकरून त्याचा आम्हाला पुढील सामन्यात फायदा होईल. संघाच्या खेळीतील कच्चे दुवे शोधून काढण्याचा हाच एक उत्तम मार्ग आहे. प्रत्येक सामन्यात प्रत्येक संघाला अडचणींनासमोरे जावे लागते. त्यातून मार्ग कसा काढायचा? या चाणाक्य नितीत    सुधारणा करण्याची गरज असल्याचेही स्कोलारी म्हणाले.
अनुभवी खेळाडूंनाही फिफा विश्वचषकात दबावाखाली खेळताना मी पाहिले आहे. त्यामुळे संघातील खेळाडूंवर दबावाचे सावट निर्माण होणे सहाजिकच आहे. दबावाला सामोरे जावून मार्ग काढण्याच्या युक्तीवर काम करणे गरजेचे आहे. असेही ते पुढे म्हणाले.