नवी दिल्ली : करोनामुळे सध्या क्रीडाविश्व ठप्प पडल्याने या दरम्यानच्या काळात क्रिकेट नेमके कोणत्या दिशेने जात आहे, याचे परीक्षण करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचे माजी महान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी व्यक्त केली.

६६ वर्षीय होल्डिंग यांनी सध्याचा काळ संपूर्ण क्रीडाजगतासाठी प्रतिकूल असला तरी याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे सुचवले आहे. ‘‘गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार बदल झाले आहेत. क्रिकेटचा भडिमारही वाढला असून नियमांमध्येसुद्धा अनेक बदल झाले आहेत. परंतु यामुळे क्रिकेट योग्य वळणावर आहे की नाही, याविषयी कोणीतरी विचार करणे गरजेचे होते. त्यामुळेच सध्याचा विश्रांतीचा काळ त्यासाठी वापरला जाऊ शकतो,’’ असे होल्डिंग म्हणाले.

‘‘नियामक मंडळे आणि खेळाडूंमधील मतभेद, सामनानिश्चिती तसेच निकालनिश्चितीची वाढती संख्या, राष्ट्रीय संघाकडून खेळण्याऐवजी पैसा मिळवण्यासाठी विविध फ्रँचाइजी लीगला प्राधान्य देणारे खेळाडू यांसारख्या अनेक गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असून त्यानुसार क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे,’’ असेही होल्डिंग यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) अधिक आर्थिक नुकसानाला सामोरे जावयाचे नसेल तर लवकरच क्रिकेटच्या सामन्यांना पुन्हा सुरुवात करावी, असेही होल्डिंग यांनी सुचवले. ‘‘क्रिकेटचे सामने खेळवूनच ‘आयसीसी’ अर्थव्यवस्था सुधारू शकते. यासाठी मग त्यांना प्रेक्षकांविना बंदिस्त स्टेडियममध्ये सामने खेळवावे लागले तरी तो पर्याय स्वीकारावा लागेल,’’ असे होल्डिंग यांनी नमूद केले.