आतापर्यंतच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून भारताविरुद्ध निर्भेळ यश मिळणार असल्याचा आत्मविश्वास दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने व्यक्त केला आहे.

‘वेगवान गोलंदाजीला कसे सामोरे जायचे, हे आम्ही चांगलेच जाणून आहोत. त्याचबरोबर दुसरीकडे भारताच्या वेगवान माऱ्याचाही आम्ही आदर करतो. प्रत्येक सामना हा आम्हाला जिंकायचाच आहे, त्यामुळे आता भारताविरुद्ध निर्भेळ यश मिळवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत,’’ असे रबाडाने सांगितले.

भारताकडून कोहलीच जास्त धावा करतो

भारतीय संघ फक्त विराट कोहलीच्याच फलंदाजीवर अवलंबून आहे, असे नाही. भारताच्या संघात काही फलंदाज नक्कीच गुणवान आहेत. पण वास्तववादी वक्तव्य करायचे तर भारताकडून कोहलीच जास्त धावा करताना दिसतो. त्याला आयसीसीचे पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध चांगली गोलंदाजी कशी करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे रबाडा म्हणाला.

भारताचा वेगवान मारा उत्तम

भारताचा वेगवान मारा उत्तम आहे. जसप्रीत बुमराहने एकदिवसीय क्रिकेटनंतर कसोटी सामन्यांमध्येही चांगली गोलंदाजी केली आहे. मोहम्मद शमीकडे चांगला अनुभव आहे. भुवनेश्वरने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच चकवले होते. त्यामुळे त्यांच्या वेगवान माऱ्यामध्ये कसलीही कमतरता नाही, असे रबाडाने सांगितले.