News Flash

हम भी किसी से कम नही – फाझल

आशियाई क्रीडा स्पर्धेत गतवर्षी आमच्या खेळाडूंनी भारताला चिवट झुंज दिली होती. आणखी दोन-तीन वर्षांमध्ये आम्ही कबड्डीत भारताची मक्तेदारी मोडून काढू,

| August 20, 2015 04:35 am

आशियाई क्रीडा स्पर्धेत गतवर्षी आमच्या खेळाडूंनी भारताला चिवट झुंज दिली होती. आणखी दोन-तीन वर्षांमध्ये आम्ही कबड्डीत भारताची मक्तेदारी मोडून काढू, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे इराणचा युवा खेळाडू फाझल अत्राचेली याने. प्रो कबड्डी स्पर्धेत बलाढय़ यु मुंबा संघाकडून खेळताना फाझलने आपल्या शैलीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. एवढेच नव्हे तर काही सामन्यांमध्ये खेळाचे पारडे आपल्या संघाच्या बाजूने झुकविण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला आहे.
इराणच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीतील प्रेक्षकांवर तो खूश आहे. त्याबद्दल तो म्हणाला, माझ्याबरोबर काही प्रेक्षकांनी छायाचित्रे काढून घेतल्यावर मला खूप आनंद झाला. काही प्रेक्षकांनी माझी स्वाक्षरीही घेतली. मी गुण मिळविल्यानंतर अनेकांनी टाळ्या वाजवीत व शिट्टी वाजवीत माझे अभिनंदन केले. हा सारा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आहे. एकूणच या लीगमध्ये प्रेक्षकांचा सहभाग उत्स्फूर्त आहे. प्रो कबड्डी लीगसाठी पुन्हा भारतात येण्यास मला निश्चित आवडेल. अशी लीग जागतिक स्तरावर आयोजित केली पाहिजे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीविषयी फाझल म्हणाला, गतवेळी आम्हाला भारताकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्या वेळी आमचे काही खेळाडू लॉबीतून बाहेर ढकलल्यामुळे बाद झाले होते. तेव्हा हे तंत्र आमच्यासाठी नवीन होते. आता आम्हीदेखील हे तंत्र शिकलो आहे. याचा प्रत्यय मी येथे दाखवून दिला आहे. अर्थात, आक्रमक खेळावरच आमचा भर असतो. ताकदीच्या जोरावर पकडी कशा करायच्या या तंत्रातही परिपक्व होण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेत दोन-तीन वेळा कबड्डी हा शब्द न उच्चारल्यामुळे फाझल बाद झाला होता. त्याबाबत विचारले असता तो म्हणाला, काही वेळा  खोलवर चढाई करताना कबड्डी हा शब्द विसरला जातो. त्याचाही मला सराव करावा लागणार आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अजून भरपूर अवधी असला तरी आम्ही आतापासूनच त्याचे नियोजन सुरू केले आहे. खेळाच्या नियमात कोठेही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. भारतामधील काही संघांबरोबर सराव सामने आयोजित करण्याचा व भारतीय संघांना आमच्या देशात निमंत्रित करीत प्रदर्शनीय सामने घेण्याची आमची योजना आहे. त्यामुळे आमच्या खेळात सुधारणा होईल व आमच्या खेळातील चुकांचे आत्मपरीक्षण करणे सोईचे
जाईल.
आमची प्रगती कासवाप्रमाणे
कबड्डी या खेळासाठी आम्ही खूप नवीन आहोत, मात्र आम्ही या खेळात कासवाच्या वेगाने प्रगती करीत आहोत. आणखी चार-पाच वर्षांमध्ये आम्ही या खेळात अव्वल दर्जाचे यश मिळवून दाखविणार आहोत, असे दक्षिण कोरियाचा खेळाडू हियुनील पार्क याने सांगितले. तो या लीगमध्ये तेलुगू टायटन्स संघाकडून खेळत आहे. यु मुंबा संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने एकाच चढाईत दोन गुण वसूल केले. त्या वेळी त्याला खूप आनंद झाला होता. या सामन्यातील कामगिरीबाबत पार्क म्हणाला, माझ्यावर संघाने जी जबाबदारी टाकली होती, ती जबाबदारी पार पाडण्यात मी यशस्वी झालो. मुंबा संघ आघाडी स्थानावरील संघ असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्ही विजय मिळविला व या विजयात माझा थोडा वाटा होता ही माझ्यासाठी संस्मरणीय कामगिरी होती. कोरियातील कबड्डीबाबत तो पुढे म्हणाला, आमच्याकडे हा खेळ अजूनही बाल्यावस्थेतच आहे. हळूहळू आम्ही या खेळात प्रगती करीत आहोत. वरिष्ठ गटाचे राष्ट्रीय स्तरावर सामने होतात, मात्र सबज्युनिअर व कुमार गटात खूप संघ नसल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सामने होत नाहीत. आणखी एक-दीड वर्षांत या गटाचेही राष्ट्रीय सामने सुरू होतील. त्या वेळी आमच्या खेळात प्रगती दिसून येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 4:35 am

Web Title: we will break india monopoly in kabaddi says fazal
टॅग : Pro Kabaddi League
Next Stories
1 प्रो कबड्डी लीग : गतविजेत्या जयपूरचे आव्हान संपुष्टात
2 १२ हजार फुटांवरून धोनीने घेतली पहिली पॅराजम्प
3 भ्रष्टाचारविरोधी पथकाला आयपीएलमधील गैरप्रकार रोखण्यात अपयश – प्रीती झिंटा
Just Now!
X