चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील मुंबईच्या दुसऱ्या कसोटीत १-१ अशी बरोबरी साधूनच कोलकात्याच्या ईडन गार्डन्सला जाण्याचा निर्धार इंग्लंडचा फलंदाज जोनाथन ट्रॉटने प्रकट केला. अहमदाबादच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर नऊ विकेट राखून विजय मिळवला होता.
‘‘मुंबईत धडाकेबाज करून कोलकात्यामध्ये १-१ अशा बरोबरीनिशीच जाणे योग्य ठरेल. आमचा हा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. मुंबईतील वातावरण निराळे आहे. पण खेळपट्टीवरील उसळी आणि फिरकीची अनुकूलता दोन्ही संघांना सहाय्यभूत ठरेल. भारताचा दौरा अप्रतिम असतो. पण चांगले क्रिकेट खेळणे हे अधिक महत्त्वाचे असते’’, असे ट्रॉटने सांगितले.
‘‘मैदानावर आमची कामगिरी दाखविण्यासाठी सज्ज झालो आहोत. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याकडे आम्ही गांभीर्याने पाहात आहोत. मालिकेत १-१ अशा बरोबरीनिशी परतण्याची आम्हाला सुरेख संधी आहे,’’ असे ट्रॉट पुढे म्हणाला.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत ट्रॉट म्हणाला की, ‘‘मी अद्याप खेळपट्टीची पाहणी केलेली नाही. परंतु नेटमधील सरावासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या खेळपट्टीप्रमाणेच ती असू शकेल. ती फिरकीला साथ देईल. मुंबईची ही लाल माती फिरकीला अधिक साथ देईल.’’
‘‘चेंडू बॅटवर व्यवस्थित येत आहे. खेळपट्टीवर चेंडू उसळीही घेत आहे. अहमदाबादची खेळपट्टी संथ होती आणि चेंडू खाली राहायचा. आमचे वेगवान गोलंदाज या खेळपट्टीचा चांगला फायदा उचलतील अशी आशा आहे’’, असे ट्रॉट यावेळी म्हणाला.