World Cup 2019 स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून विविध चर्चांनी मागील काही दिवस जोर धरला आहे. त्यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने उपस्थित केलेल्या (BCCI) क्रिकेटपटूंच्या सुरक्षेसंदर्भातील संबंधित सर्व बाबींवर आम्ही लक्ष पुरवू. तसेच गरज भासल्यास खेळाडूंच्या सुरक्षिततेतही अधिक वाढ करू, असे आश्वासन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिले आहे.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या दु:खात सहभागी होत देशभरातील क्रीडाचाहत्यांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये, असा सूर लावला आहे. ‘‘विश्वचषकातील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यासंदर्भात खेळाडू, प्रेक्षक व व्यवस्थापक यांच्या सुरक्षिततेविषयी ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष राहुल जोहरी यांनी ‘आयसीसी’कडून सहकार्य मागितले आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी ‘बीसीसीआय’ला आश्वासन देत आयसीसी विश्वचषक स्पध्रेच्या प्रत्येक सामन्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहे, असे नमूद केले.

भारतीय क्रिकेटरसिकांना डोकेदुखी

पाकिस्तान प्रीमियर लीगच्या दुबई स्पोर्ट्स स्टेडियमवर झालेल्या एका सामन्यात भारतीय क्रीडारसिकांना स्टेडियममध्ये प्रवेश करताना अडथळ्यांचा सामना करावा लागला. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे दोन चाहत्यांना अडवण्यात आले होते. मात्र चौकशी केल्यानंतर त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला.