20 January 2018

News Flash

नया इतिहास लिखेंगे..

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीच्या ‘हॅलिकॉप्टर’ने चौफेर घिरटय़ा घातल्या. भारताची आघाडीची फळी ‘त्रिफळा’बाधित झाली असताना धोनीने संघाला सावरत समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. चेन्नई सुपर किंग्जच्या

प्रशांत केणी, कोलकाता | Updated: January 2, 2013 4:46 AM

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीच्या ‘हॅलिकॉप्टर’ने चौफेर घिरटय़ा घातल्या. भारताची आघाडीची फळी ‘त्रिफळा’बाधित झाली असताना धोनीने संघाला सावरत समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. चेन्नई सुपर किंग्जच्या तीन वीरांची चेपॉकवरील ही कर्तबगारी मग भारतीय गोलंदाजांनी वाया घालवली. पाकिस्तानचा सलामीवीर नासिर जमशेदने संयमी शतकी खेळी साकारत पाकिस्तानला मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला. घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धोनीसेनेला मालिकेतील आव्हान शाबूत राखायचे असेल तर कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील दुसरी लढाई जिंकणे आता क्रमप्राप्त आहे. ईडन गार्डन्सवर भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील विजयाची आकडेवारी जरी अनुकूल असली तरी या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध आपण एकदाही जिंकू शकलेलो नाही. त्यामुळे या ऐतिहासिक मैदानावर नवा इतिहास लिहिण्याच्याच आवेशाने धोनीसेनेला उतरावे लागणार आहे.
ईडन गार्डन्सवर भारताने १७ सामन्यांपैकी १० विजय मिळवले आहेत आणि ६ पराजय वाटय़ाला आले आहेत. पण भारत-पाकिस्तान यांच्यातील तिन्ही सामने हे पाकिस्तानने जिंकले आहेत. पाकिस्तानने या मैदानावरील ५ पैकी ४ सामने जिंकत आपली आकडेवारी अधिक चांगली राखली आहे. नेमक्या याच आकडेवारीचे दडपण भारतावर असेल.
१८ फेब्रुवारी १९८७ या दिवशी भारत-पाकिस्तान या सामन्यानेच ईडन गार्डन्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि योगायोग पाहा, याच दोन प्रतिस्पध्र्यामध्ये गुरुवारी येथील २५वा एकदिवसीय सामना होत आहे. कसोटी क्रिकेट पदार्पणानंतर तब्बल ५३ वर्षांनी या स्टेडियमला मर्यादित षटकांचे भाग्य लाभले. त्या सामन्याला ९० हजारहून अधिक क्रिकेटरसिकांनी हजेरी लावली होती. अपेक्षेप्रमाणे रोमहर्षक झालेली ही लढत पाकिस्तानने दोन विकेट आणि ३ चेंडू राखून जिंकली आणि सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. सलामीवीर के. श्रीकांतने एक षटकार आणि १४ चौकारांच्या साहाय्याने १२३ धावांची शानदार खेळी साकारली आणि मोहम्मद अझरुद्दीन याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने ४० षटकांत २३८ धावांचे आव्हान उभे केले. पाकिस्तानच्या रमीज राजा आणि युनूस अहमद यांनी शतकी सलामी नोंदवली. पण त्यानंतर त्यांची ५ बाद १६१ अशी अवस्था झाली. पण सलीम मलिक पाकिस्तानचा तारणहार ठरला. त्याने फक्त ३५ चेंडूंत एक षटकार आणि ११ चौकारांसह ७२ धावांची खेळी उभारून विजय पाकिस्तानच्या आवाक्यात आणला. दुखापत झाली असतानाही खेळणाऱ्या मणिंदर सिंगला पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगलाच चोप देत १० षटकांत ७० धावा काढल्या होत्या.
ईडन गार्डन्सवर भारताची पाकिस्तानशी दुसऱ्यांदा गाठ पडली ती एमआरएफ वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पध्रेत. २८ ऑक्टोबर १९८९ या दिवशी झालेला हा सामना पाकिस्तानने ७७ धावांनी आरामात जिंकून सहजपणे उपांत्य फेरी गाठली. पाकिस्तानने २७९ धावांचा बुरुज उभारला होता. हे आव्हान मुळीच सोपे नव्हते. इम्रान खानने अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये बॅटचे सपासप वार करीत ३९ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या. कपिलच्या अखेरच्या षटकात इम्रान आणि अक्रम रझा यांनी १९ धावांची बरसात केली. त्यानंतर श्रीकांत आणि रमण लांबा यांनी भारताला २१ षटकांत १२० धावांची दमदार सलामी नोंदवून दिली. मात्र उर्वरित फलंदाजांनी केवळ हजेरी लावल्यामुळे भारताचा अख्खा संघ २०२ धावांत गारद झाला.
२००४ साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अमृतमहोत्सवानिमित्त ईडन गार्डन्सवर एकमेव सामना झाला होता. १३ नोव्हेंबरला झालेल्या त्या सामन्याला ९० हजार क्रिकेटरसिकांनी उपस्थिती राखली होती. पण उत्तरार्धात रंगतदार झालेला हा सामना पाकिस्तानने ६ विकेट आणि ६ चेंडू राखून जिंकला. क्रिकेट कारकिर्दीमधील सहाव्या एकदिवसीय सामन्यात खेळणाऱ्या २० वर्षीय सलमान बटने नाबाद १०७ धावांची अप्रतिम खेळी साकारली. त्यामुळेच पाकिस्तानला भारताचे २९३ धावांचे लक्ष्य सहज गाठता आले. भारताकडून युवराज सिंगने ६२ चेंडूंत ७८ धावांची धुवाधार खेळी उभारली होती.

First Published on January 2, 2013 4:46 am

Web Title: we will right new history
  1. No Comments.