महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच भविष्याचा विचार करत असतो, प्रत्येक सामन्यासाठी त्याच्यासाठी आव्हानेही नवीन असतात. धोनीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यावर साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. निवृत्तीनंतर धोनीने तिरंगी मालिकेच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला खरा, पण निवृत्तीबद्दल चकार शब्द न काढता त्याने विश्वविजेतेपद कायम राखण्याबद्दल भाष्य केले.
पत्रकार परिषदेमध्ये धोनीला त्याच्या निवृत्तीबाबत विचारल्यावर धोनी फक्त हसला. ‘‘ही चांगली गोष्ट आहे की मला काही वेळ विश्रांती करायला मिळाली. खेळ कोणताही असो पण देशासाठी खेळणे हा सन्मान असतो. तो सन्मान मला मिळाला, याचा आनंद आहे. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळण्यासाठी जोरदार स्पर्धा असते, पण मला भारताची जर्सी परिधान करायला मिळाली, याचा नक्कीच आनंद आहे,’’ असे म्हणत धोनीने मूळ प्रश्नाला बगल दिली. पण त्यावेळीच त्याने आगामी विश्वचषकाबद्दल आपली मते मांडली.
विश्वचषकाबद्दल धोनी म्हणाला की, ‘‘२०११च्या विश्वविजयाची पुनरावृत्ती करायला नक्कीच आम्हाला आवडेल. पण येथील वातावरण वेगळे आहे आणि त्यानुसार आम्हाला खेळावे लागेल. क्रिकेटच्या सर्व प्रकारांसाठी मेलबर्नचे मैदान विश्वातील काही सर्वोत्तम मैदानांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे याच मैदानात होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आम्ही पोहोचू, अशी आशा आहे.’’
विश्वचषकाच्या संघाबाबत विचारले असता धोनी म्हणाला की, ‘‘भारतीय संघामध्ये बरेच युवा चेहरे आहे, एक युवा संघ विश्वचषकासाठी बांधला आहे. लागोपाठ विश्वचषक पटकावणे हे नेहमीच अविस्मरणीय असते. त्यामुळे विश्वविजेतेपद कायम राखण्यावर आमचा भर असेल. ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळणे हे नेहमीच आनंददायी असते.’’
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने धावांची टांकसाळ उघडली होती. त्याच्याबद्दल विचारले असता धोनी म्हणाला की, ‘‘कसोटी मालिकेनंतर तिरंगी एकदिवसीय मालिकेमध्ये त्याच्याकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा असेल. तुम्ही कसोटी खेळता की एकदिवसीय क्रिकेट, यापेक्षा धावा करणे महत्त्वाचे असते. देशाचे प्रतिनिधित्व करताना प्रत्येक सामना हा महत्त्वाचा असतो.’’