द्रोणावली हरिका,आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू

सर्वसाधारण डावांपेक्षा ‘ऑनलाइन’ डावांच्या स्पर्धेत संगणकापासून दूर जाण्याची फारशी संधी नसते. साहजिकच तेथे तुमच्या एकाग्रतेचीच अधिक कसोटी असते. अर्थात हा अनुभवही मनोरंजनात्मक व आल्हाददायक असतो, असे पहिल्या ऑनलाइन डावांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या द्रोणावली हरिकाने सांगितले. महिलांची पहिलीच ऑनलाइन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच रोम येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताची अव्वल दर्जाची खेळाडू हरिकाने विजेतेपदाला गवसणी घातली. हरिकाने खुल्या जागतिक स्पर्धेतही यंदा कांस्यपदक मिळवले होते. ऑनलाइन डावांच्या स्पर्धेविषयी हरिकाशी केलेली बातचीत-

ल्ल विश्वविजेतेपदाची खात्री होती काय?
ऑनलाइन सराव करणे व प्रत्यक्ष स्पर्धेतील डाव खेळणे यात खूपच फरक आहे. त्यामुळे या स्पर्धेत विजेतेपदाची खात्री नव्हती. तसेही मला चौथे मानांकन देण्यात आले होते. वेगळा अनुभव मिळवायच्या हेतूनेच मी या स्पर्धेत भाग घेतला होता. अर्थात प्रत्येक खेळाडूसाठी हा पहिलाच अनुभव असल्यामुळे विजेतेपदाचा कोणीही दावेदार नव्हता. प्रत्येक खेळाडू सावधगिरीनेच व संयमानेच डावपेच आखत होता. सर्व डाव संपल्यानंतरदेखील आपण विजेतेपद मिळविले आहे याची मला कल्पना आली नाही, कारण जॉर्जियाची नॅना झिग्निडेझ व माझे गुण समान झाले होते. प्रगत गुणांच्या आधारे मला विजेतेपद मिळाले.
ल्ल विजेतेपद निश्चित झाल्यावर तुझी काय प्रतिक्रिया होती?
मुलखावेगळ्या स्पर्धेत आपण काही तरी मोठी कामगिरी करून दाखवू शकलो, याचाच मला जास्त आनंद झाला. तसेच एकाच वेळी तीन-चार तास एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो, हा आत्मविश्वासही या स्पर्धेद्वारे मला मिळाला. त्याचा फायदा मला भावी कारकीर्दीसाठी होणार आहे.
ल्ल एरवीच्या डावांपेक्षा या स्पर्धेचा अनुभव कसा होता?
एरवी आपण एखादी चाल केल्यानंतर आजूबाजूला अन्य खेळाडूंचे डाव पाहू शकतो. फेरीही मारू शकतो. मात्र ऑनलाइन डावाच्या वेळी खेळाडूला फक्त संगणकाकडेच लक्ष ठेवावे लागते. तीन-चार तास सलग त्याच्यापासून बाजूलाही जाऊ शकत नाही. या स्पध्रेत मानसिक दडपणाचीही खूप कसोटी असते, असे माझे मत आहे. प्रत्येक डावानंतर संगणक प्रणालीत बदल करण्यासाठी दोन-तीन मिनिटांचा अवधी लागतो. तेवढाच वेळ तुम्हाला विश्रांती मिळू शकते. जागतिक स्पर्धेत दहा खेळाडूंचा सहभाग होता व प्रत्येक खेळाडूबरोबर दोन वेळा ऑनलाइन डाव अशी एकूण १८ डावांची ही स्पर्धा होती. नऊ डावांनंतर दहा-पंधरा मिनिटांची विश्रांती मिळाली. अर्थात या डावांमध्येही तुम्हाला भरपूर शिकायला मिळते आणि खेळाचाही निखळ आनंद घेता येतो.
ल्ल ऑनलाइन स्पर्धेचे स्वरूप खेळाच्या वाढीसाठी उपयुक्त होईल काय?
होय. अनेक खेळाडूंना विविध कारणांस्तव स्पर्धात्मक अनुभव घेता येत नाही. अशा खेळाडूंना घरबसल्या चांगल्या खेळाडूंबरोबर स्पर्धात्मक अनुभव घेता येणे शक्य आहे. या स्वरूपामुळे खेळाडूंना प्रवासाकरिता लागणारा वेळ व पैसा वाचणार आहे. संयोजकांनाही अशा स्वरूपाची स्पर्धा आयोजित करणे सोपे होणार आहे. अधिकाधिक देशांमधील अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाइन स्वरूपाची स्पर्धा उपयुक्त होणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.
ल्ल आता नजीकचे ध्येय कोणते आहे?
अर्थात खुल्या गटाचे विश्वविजेतेपद मिळवणे, हे माझे नजीकचे ध्येय आहे. यंदा महिलांच्या खुल्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत मला मारिया मुझीचूककडून पराभव स्वीकारावा लागला. तेथे मला कांस्यपदक मिळाले. मात्र या पदकाबाबत मी समाधानी नाही, कारण मारियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत मला निसटता पराभव स्वीकारावा लागला. काही वेळा एखादी छोटी चूकही डावाला कलाटणी देऊ शकते. माझ्याबाबत असेच घडले. मारियाविरुद्ध मी विजय मिळवू शकले असते. माझ्यासाठी उपांत्य फेरीपर्यंतची मजलदेखील खूप मोठी कामगिरी आहे. जागतिक स्पर्धेत खेळताना कोणते डावपेच करावयाचे असतात, याचा मी बारकाईने अभ्यास केला आहे व पुढच्या वेळी अधिक चांगली कामगिरी होईल अशी मला खात्री आहे. माझ्या या वाटचालीत लक्ष्य फाऊंडेशन व केंद्र शासनाने दिलेल्या आर्थिक पाठबळाचा मोठा वाटा आहे. पुढच्या वर्षी अधिक उज्ज्वल यश मिळवण्याचे माझे ध्येय आहे.