राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळविले असले तरी बुद्धिबळात अव्वल दर्जाचे यश मला खुणावत आहे. विशेषत: जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करण्याची क्षमता माझ्याकडे आहे आणि त्याचा उपयोग करीत मोठे यश मिळविण्याकरिता मी कसून सराव करीत आहे, असे पुण्याची महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथन हिने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीला सांगितले.
सौम्या हिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या गटात अजिंक्यपद मिळविले आहे. गतवर्षी राष्ट्रीय ‘अ’ श्रेणीत विजेतेपद मिळविणाऱ्या या खेळाडूने कारकिर्दीत आजपर्यंत अनेक स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे. तीन वर्षांपूर्वी तिने २० वर्षांखालील महिलांच्या विभागात जगज्जेतेपदाला गवसणी घातली होती. जागतिक सांघिक स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व करताना कौतुकास्पद कामगिरी केली होती. आजपर्यंतच्या तिच्या कारकिर्दीविषयी आणि आगामी स्पर्धाबाबत तिने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
राष्ट्रकुल स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची खात्री होती काय?
विजेतेपद मिळविण्याची खात्री नव्हती मात्र स्वत:च्या क्षमतेइतका खेळ करीत सर्वोत्तम यश मिळविण्याचे माझे ध्येय होते. या स्पर्धेत मेरी अ‍ॅन गोम्स, निशा मोहोता यांच्यासह अनेक तुल्यबळ महिलांचा समावेश होता. त्यामुळे विजेतेपदासाठी खूप चुरस होती. शेवटच्या फेरीअखेर आम्हा तीनही खेळाडूंचे प्रत्येकी साडेसात गुण झाले. माध्यम गुणांच्या आधारे मला विजेतेपद मिळाले.
या स्पर्धेत परदेशातील अनेक नामवंत खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्यासमवेत खेळण्याचा अनुभव कसा होता?
अनेक नामवंत परदेशी खेळाडूंसह ४५० खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रत्येक फेरीत तुल्यबळ प्रतिस्पर्धी लाभल्यामुळे त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. तिसऱ्या फेरीत माझ्यापुढे अग्रमानांकित सर्जी तिव्हियाकोव यांचे आव्हान होते. नेदरलँड्सच्या या खेळाडूबरोबरचा डाव खूप रंगतदार झाला. खरंतर हा डाव मी गमावणारच होते मात्र डावाच्या शेवटी मी चिवट झुंज दिली व ८६ चालींपर्यंत चाललेला हा डाव बरोबरीत सोडविला. अग्रमानांकित खेळाडूशी झालेल्या डावातील बरोबरीचा फायदा मला विजेतेपदासाठी उपयोगी पडला. विशेषत: माध्यम गुणांसाठी त्याचा फायदा झाला. तसेच या स्पर्धेनिमित्त अनेक परदेशी खेळाडूंबरोबर संवाद साधण्याचीही संधी मला मिळाली. हा संवादही आपल्याला भावी कारकिर्दीसाठी उपयुक्त ठरतो. परदेशी खेळाडूंचे डावपेच पाहण्याचीही संधी मला मिळाली.
आता नजिकचे ध्येय कोणते आहे? पुढील वर्षी कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये तू भाग घेणार आहे?
सध्या माझे २२६८ मानांकन गुण आहेत. पुढील वर्षी २४०० गुणांचा टप्पा गाठण्याचे माझे ध्येय आहे. पुढील वर्षी पाश्र्वनाथ चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, जागतिक सांघिक स्पर्धासह अनेक महत्त्वाच्या स्पर्धामध्ये चांगले यश मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील. सातत्यपूर्ण कामगिरी करण्यावर माझा भर राहील.
कारकिर्दीतील आजपर्यंतच्या वाटचालीचे श्रेय तू कोणास देते?
कुंटे चेस अकादमीत मला ग्रँडमास्टर अभिजित कुंटे तसेच मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच लक्ष्य-फ्लेम फाउंडेशन या सर्वाचे ऋण माझ्यावर आहे.