उत्तेजकप्रकरणी निरपराध असल्याचा दावा

नवी दिल्ली : उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्याने निलंबित करण्यात आलेली भारतीय वेटलिफ्टर संजीता चानूने निरपराध असल्याचा दावा केला आहे. तसेच निलंबनाविरोधात दाद मागणार असल्याचे तिने म्हटले आहे.

‘‘कोणतेही प्रतिबंधित उत्तेजक घेतलेले नसल्याने मी निरपराध आहे. राष्ट्रीय महासंघाच्या माध्यमातून मी या निर्णयाला आव्हान देणार आहे,’’ असे संजिताने सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या संजितावर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने निलंबनाची कारवाई केली आहे. टेस्टेस्टेरॉन या प्रतिबंधित घटकाचा अंश तिच्या नमुन्यात आढळून आला होता.दरम्यान, संजिता ही निरपराध असल्याबाबत भारतीय वेटलिफ्टिंग संघटनादेखील ठाम आहे. त्यामुळे या मणिपुरी खेळाडूच्या पाठीशी उभे राहून संघटना निलंबनाला आव्हान देणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी म्हटले आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या एका नमुन्यात ती दोषी आढळल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संघटनेने केला आहे.  ‘‘या प्रकरणात आम्ही ‘ब’ नमुन्याचीही तपासणी करण्याची मागणी करणार आहे. कारण संजिताने प्रतिबंधित उत्तेजक घेतले नसल्याची आमची खात्री आहे,’’ असे यादव यांनी सांगितले.