करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसला. १३ मार्च २०२०, ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट मैदानावर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन-डे सामना खेळवला गेला आणि त्यानंतर आयसीसीने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय सामने थांबवले. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र यानंतर तब्बल ४ महिने सर्व क्रिकेट सामने बंद होते. क्रिकेटप्रेमींनी या काळात जुन्या सामन्यांच्या हायलाईट्स पाहत आपली तहान भागवली. परंतू प्रदीर्घ काळ सामने बंद असल्यामुळे आयसीसी आणि इतर क्रिकेट बोर्डांना आर्थिक फटका बसायला लागला.

करोनावर ठोस लस मिळालेली नसतानाही Bundesliga, La Liga, EPL यासारख्या महत्वाच्या युरोपियन फुटबॉल स्पर्धा सर्व नियम पाळून प्रेक्षकांविना सुरु करण्यात आल्या. मग क्रिकेटने तरी मागे का रहावं. रखडलेली गाडी सुरु करण्यासाठी आयसीसीने सर्वात प्रथम खेळाडूंना सरावाची परवानगी दिली. यानंतर काही काळाने लॉकडाउनपश्चात पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळवण्याचं निश्चीत झालं. ८ जुलैपासून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. तब्बल ४ महिन्यांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा रुळावर येतंय. या निमीत्ताने आयसीसीने क्रिकेट हा खेळ जगभरातील चाहते आणि खेळाडूंसाठी इतका महत्वाचा का आहे हे सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

Welcome back, cricket! You’ve been missed अशी कॅप्शन देत आयसीसीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. आयसीसीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही चांगली पसंती दर्शवली आहे.

लॉकडाउनपश्चात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आयसीसीने नवीन नियम आखून दिले आहेत. ज्यात चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ वापरण्यास प्रतिबंध पासून ते सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम क्रिकेटमध्ये लागू होणार आहेत. त्यामुळे या नवीन नियमांप्रमाणे क्रिकेट कसं खेळलं जातंय हे पाहणं महत्वाचं ठरेल.

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका संपल्यानंतर इंग्लंडचा संघ नेदरलँडसोबत वन-डे आणि पाकिस्तान संघासोबत कसोटी आणि वन-डे मालिका खेळणार आहे. त्यामुळे येत्या काही काळात क्रिकेटप्रेमींची पर्वणी असणार आहे यात शंका नाही.