सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने आशिया चषकात पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केली आहे. दुबईच्या मैदानात Super 4 गटात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकवर ९ गडी राखून मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं २३८ धावांचं आव्हान भारताने रोहित-शिखरच्या भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीपासून सावध सुरुवात करत खेळपट्टीवर आपले पाय रोवले. यानंतर दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत रोहित-शिखरने धावा कुटल्या.

अवश्य वाचा – हिटमॅन-गब्बरच्या शतकी खेळीपुढे पाकिस्तानची धुळधाण, ९ गडी राखून विजय मिळवत भारत अंतिम फेरीत

आपलं शतक झळकावल्यानंतर शिखर धवन चोरटी धाव घेत असताना धावबाद होऊन माघारी परतला. शिखरने १०० चेंडूत ११४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने कर्णधार रोहित शर्माने १११ धावांची नाबाद खेळी केली. शिखर धवनला आक्रमक खेळीसाठी सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. भारताच्या या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अन्य माजी भारतीय खेळाडूंनी संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.