वेंगसरकरांकडून विद्यापीठ क्रिकेटच्या आठवणींना उजाळा
‘‘मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करायचो, तेव्हा १० रुपये दैनंदिन भत्ता मिळायचा. आम्ही अनारक्षित द्वितीय श्रेणीच्या डब्यांतून प्रवास करायचो. त्यामुळे जागा मिळाली, तरच झोपायला मिळायचे. ते दिवस सुखाचे आणि आनंददायी होते,’’ अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी विद्यापीठ क्रिकेटच्या आठवणी जागवल्या.
ते पुढे म्हणाले, ‘‘त्यावेळी रोहिंटन बारिया करंडक आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धा ही अतिशय महत्त्वाची असायची. दिल्लीविरुद्ध मी १९० धावांची खेळी साकारली होती.’’
आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पध्रेत दोन माजी कर्णधारांच्या खेळी मला अजून आठवतात. क्रिकेटमध्ये खेळाडूच्या विकासात आंतरविद्यापीठ स्पध्रेचे महत्त्वाचे स्थान आहे, असे वेंगसरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी अजित वाडेकर यांचे दिल्ली विद्यापीठाविरुद्धचे त्रिशतक पाहिले आहे. आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पध्रेत सुनील गावस्कर यांनीही सातत्याने धावा केल्या. त्यांच्या बहुतांशी खेळी मी पाहिल्या आहे. याच बळावर गावस्कर यांची १९७१च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली होती.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे १६ आणि १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंना प्रवासासाठी अव्वल दर्जाच्या सुविधा दिल्या जातात. हवाई प्रवास आणि दर्जेदार हॉटेल यांचा अंतर्भाव असतो. मुंबई विद्यापीठ प्रथमच या स्पध्रेचे यजमानपद भूषवत आहे.’’
रिझवी महाविद्यालयातर्फे (वांद्रे) महिलांच्या आंतरविद्यापीठ पश्चिम विभागीय आणि अखिल भारतीय स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय स्पध्रेत ३४ विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक विभागातील अव्वल दोन संघ १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय स्पध्रेसाठी पात्र ठरतील.