रोस्टन चेसचे दुसरे शतक आणि कर्णधार जेसन होल्डरसोबत साकारलेली विक्रमी नाबाद भागीदारी या बळावर वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ६ बाद २८६ धावा उभारल्या.

केनसिंगटन ओव्हल येथे सुरू असलेल्या या सामन्यात कर्णधार होल्डरने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. त्यामुळे ६ बाद १५४ अशी केविलवाणी अवस्था त्यांची झाली. मात्र चेसने २०७ चेंडू आणि पाच तास किल्ला लढवत १७ चौकारांसह नाबाद १३१ धावा काढून संघाचा डाव सावरला. त्याला होल्डरनेही तोलामोलाची साथ देत सातव्या विकेटसाठी नाबाद १३२ धावांची विक्रमी भागीदारी रचली. होल्डरने साडेतीन तास झुंज देत ८ चौकारांसह आपली नाबाद ५८ धावांची खेळी उभारली.

वेगवान गोलंदाजांना अतिशय कमी साथ देणाऱ्या या खेळपट्टीवरसुद्धा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना टिकाव धरता आला नाही. मोहम्मद आमिर आणि मोहम्मद अब्बास यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पदार्पणवीर शदाब खान आणि लेग-स्पिनर यासिर शाह यांनी एकेक बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज : ८९ षटकांत ६ बाद २८६ (रोस्टन चेस खेळत आहे १३१, जेसन होल्डर खेळत आहे ५८; मोहम्मद अब्बास २/४७, मोहम्मद आमिर २/५२)