भारत ‘अ’ संघाच्या माथी मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर किर्क एडवर्ड्सने दिमाखदार शतकी खेळी साकारल्यामुळे वेस्ट इंडिज ‘अ’ संघाने तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ४५ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे वेस्ट इंडिज ‘अ’ संघाकडून भारताने १-२ अशा फरकाने मालिकेत पराभव पत्करला. याआधी भारतीय संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले होते.
यजमान भारत ‘अ’ संघाने पहिला सामना ७७ धावांनी जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज ‘अ’ संघाने ५५ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातच मालिकेचे भवितव्य ठरले.
अखेरच्या सामन्यात संघनायक युवराज सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम श्रेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुन्हा निराशा केली आणि वेस्ट इंडिज ‘अ’ संघाला ५० षटकांत ९ बाद ३१२ धावा अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मदत केली. भारताच्या जयदेव उनडकटने ५५ धावांत ५ बळी घेतले.
एडवर्ड्सने चेंडूगणीक धावेचे गणित जपत १०४ धावांची खेळी साकारली. त्याला लिऑन जॉन्सन (४२ चेंडूंत ५४ धावा) आणि कर्णधार किरान पॉवेल  (४०) आणि जोनाथन कार्टर (३५) यांनी छान साथ दिली. त्यामुळे वेस्ट इंडिजला तीनशेपलीकडे मजल मारता आली.
प्रत्युत्तरादाखल भारताला मर्यादित षटकांत ८ बाद २६७ धावाच करता आल्या. उन्मुक्त चंदऐवजी सलामीला उतरलेल्या युवा बाबा अपराजितने भारत ‘अ’ संघाकडून ९६ चेंडूंत सर्वाधिक ७८ धावांची खेळी उभारली. याचप्रमाणे कर्णधार युवराज सिंगने ५९ चेंडूंत धडाकेबाज ६१ धावा केल्या. याव्यतिरिक्त भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकी गोलंदाज वीरासॅमी परमॉलने ५५ धावांत ३ बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज मिग्वेल कमिन्सने ४६ धावांत २ बळी घेतले.