जोनाथन कार्टरच्या मॅरेथॉन शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज अ संघाने दुसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात भारतावर ५५ धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजची अवस्था २ बाद २१ अशी होती. मात्र कार्टरने सूत्रधाराची भूमिका निभावत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी किर्क एडवर्ड्ससह ७९ धावांची भागीदारी केली. पाचव्या विकेटसाठी एल.आर. जॉन्सन-कार्टर जोडीने १३१ धावा जोडल्या. कार्टरचे साथीदार ठरावीक अंतराने बाद झाल्याने वेस्ट इंडिज अ संघाला तीनशेचा टप्पा ओलांडता आला नाही. कार्टरने १८ चौकार आणि ३ षटकारांसह १३३ धावांची खेळी केली. भारतातर्फे आर. विनय कुमारने ३ बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मिग्युेल कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. पहिल्या सामन्यातील शतकवीर आणि कर्णधार युवराज सिंग ४० धावांवर बाद झाला. मोठी खेळी करण्यात भारतीय फलंदाजांना अपयश आले आणि भारताचा डाव २२४ धावांतच संपुष्टात आला. मिग्युेल कमिन्सने ३१ धावांत ४ बळी टिपले. शतकी खेळी करणाऱ्या कार्टरने २ बळी टिपत गोलंदाजीतही आपली चमक दाखवली. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. १९ सप्टेंबरला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे.