वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंचे मानधन यांच्यात प्रदीर्घ काळ सुरूच असलेला वाद आता मिटण्याची चिन्हे आहेत. रविवारी इंग्लंडला हरवून विश्वविजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला मंडळाकडून वाटाघाटींसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरून यांनी विश्वविजेत्या संघातील खेळाडूंना अभिनंदनाचे संदेश पाठवले आहेत. याचप्रमाणे जूनमध्ये या वादावर तोडगा काढू, असे आश्वासनही दिले आहे.
‘‘मंडळाकडून खेळाडूंशी संवाद साधण्यात येणार आहे. येत्या मे महिन्यात खेळाडू, त्यांची संघटना, निवड समिती आणि तांत्रिक समिती यांचा आढावा घेण्यात येईल. वेस्ट इंडिजमधील गुणवत्ता शोधणे, हे त्याचे महत्त्वाचे लक्ष्य असेल,’’ असे कॅमेरून यांनी सांगितले.
विश्वविजेतेपदानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीने आपले खंत प्रकट केली होती. विंडीज मंडळाकडून कोणतेही सहकार्य आणि आदराची वागणूक मिळत नसल्याचे त्याने सांगितले होते. कॅमेरून यांनी सॅमीच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवत त्याची प्रतिक्रिया अनुचित असल्याचे म्हटले आहे.

वेस्ट इंडिज मंडळाने खेळाडूंना पाठिंबा द्यावा -तेंडुलकर
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा आयसीसी ट्वेन्टी-२० जगज्जेतेपदाला गवसणी घालणारा वेस्ट इंडिज हा खराखुरा अजिंक्य संघ आहे, असे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सांगितले. याचप्रमाणे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने खेळाडूंच्या वेदना समजून घेऊन त्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहनही केले. ‘‘वेस्ट इंडिजच्या संघाने मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्या अशा दोन्ही आघाडय़ांवरील आव्हाने पेलत विश्वविजेतेपद पटकावले. वेस्ट इंडिजचा पुरुष आणि महिला संघ तसेच काही दिवसांपूर्वी १९ वर्षांखालील युवा संघाने कमाल केली. वेस्ट इंडिजच्या सर्वच संघांनी अफलातून कामगिरी केली. ब्रेथवेटची खेळी थरारक होती,’’ अशा शब्दांत सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.