सध्या जमैकामध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग (CPL) सुरू आहे. या स्पर्धेत देशभरातील धडाकेबाज खेळाडूंचा विविध संघांमध्ये भरणा आहे. याच स्पर्धेत युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या वादळी खेळीने मंगळवारची संध्याकाळ गाजवली. त्याने धडाकेबाज शतकी खेळी केली. त्याने ५४ चेंडूत १०० धावा केल्या आणि CPL मध्ये तब्बल ४ शतके करण्याचा विक्रम रचला. याशिवाय टी २० क्रिकेटमध्येही हे त्याचे २२ शतक ठरले.

जमैका थलायवाज आमि पॅट्रिओट्स संघांमधील या सामन्यात तब्बल ३९ षटकांत ४८३ धावा ठोकण्यात आला. या टी २० सामन्यात तब्बल ३७ षटकार लगावण्यात आले. एका टी २० क्रिकेट सामन्यात एकाच सामन्यात एवढे षटकार लागण्याची ही दुसरी वेळ ठरली. या सामन्यात ३७ षटकारांची आतषबाजी झाली. यापूर्वी २०१८ मध्ये अफगाणिस्तान प्रीमिअर लीग स्पर्धेत बल्ख लीजंड्स आणि काबुल झ्वानन या संघामध्ये झालेल्या सामन्यात ३७ षटकार मारण्यात आले होते.

जमैका संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २४१ धावा केल्या. त्यात ख्रिस गेलने ६२ चेंडूंत ७ चौकार व १० षटकार ठोकत ११६ धावांची तुफानी खेळी केली. टी २० क्रिकेटमध्ये त्याने २२ वे शतक आपल्या नावे केले. त्याला चॅडवीक वॉल्टनने उत्तम साथ दिली. वॉल्टनने ३६ चेंडूंत ३ चौकार व ८ षटकारांसह ७३ धावांची खेळी साकारली. तर पॅट्रिओट्सच्या फॅबीयन अ‍ॅलनने ३० धावांत २ बळी आणि अल्झारी जोसेफने ३९ धावांत २ बळी टिपले.

‘गेल’वादळाची शतकी खेळी निष्पळ ठरली. सेंट किट्स अ‍ॅण्ड नेव्हील्स पॅट्रिओट्स संघाने या सामन्यात बाजी मारली. पॅट्रिओट्स संघाने आश्चर्यकारकरित्या हे लक्ष्य केवळ १८.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. डेव्हॉन थॉमस आणि एव्हीन लुईस यांनी पॅट्रिओट्स संघाला दमदार सुरुवात केली. त्यांच्या धडाक्यामुळे जमैका थलायवाज संघाचे गोलंदाज हतबल झाले. या दोघांनी ३३ चेंडूत तब्बल ८५ धावा कुटल्या. थॉमसने ४० चेंडूत ८ चौकार व ३ षटकार लगावत ७१ धावांची दमदार खेळी केली. तर लुईसने CPL मधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्याने १८ चेंडूत ३ चौकार व ६ षटकारांसह ५३ धावांची खेळी साकारली.

त्यानंतर लॉरी इव्हान्स आणि थॉमस यांनी ४० चेंडूमध्ये ७६ धावांची भागीदारी केली. इव्हान्सने २० चेंडूत ४१ धावा ठोकल्या. त्याने २ चौकार व ४ षटकार लगावले. अ‍ॅलननेही १५ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. त्याने ५ चौकार व २ षटकार मारले. तर शामराह ब्रुक्सने १५ चेंडूत २७ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ३ चौकार व १ षटकाराचा समावेश होता.

दरम्यान, दोनही संघांनी मिळून ३९ षटकात ठोकल्या तब्बल ४८३ धावा केल्या.