भारत दौरा अर्धवट सोडून तडकाफडकी मायदेशी परतणाऱ्या वेस्ट इंडिजविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मालिकाविरामाचे हत्यार उगारले आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचे धोरण निश्चित केले. बीसीसीआयच्या आक्रमक भूमिकेमुळे नरमलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आता वाटाघाटीच्या दिशेने पावले टाकली आहेत. विंडीज क्रिकेट मंडळाने या घटनेबाबत दिलगिरी प्रकट करीत बीसीसीआयकडे चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या मंगळवारी आठ तास झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारत दौरा अर्धवट झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी प्रकट करीत आहोत, परंतु ही परिस्थिती का उद्भवली, याचा आढावा आम्ही घेत आहोत.
‘‘वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि बीसीसीआय यांच्यातील संबंध गेली अनेक दशके चांगले आहेत. बीसीसीआयच्या निर्णयांबाबत आम्ही बैठकीमध्ये गांभीर्याने चर्चा केली. त्यांचा वेस्ट इंडिजच्या क्रिकेटवर मोठा परिणाम होऊ शकेल,’’ असे या निवेदनात म्हटले आहे.
विंडीजने भारत दौरा अर्धवट सोडल्याने बीसीसीआयचे अंदाजे ६ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हैदराबादला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत बीसीसीआयने वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे.