News Flash

भारत-वेस्ट इंडिज सराव सामना : ‘कसोटी’पूर्वी लय मिळवण्याचे लक्ष!

भारत-वेस्ट इंडिज अध्यक्षीय इलेव्हन संघांमधील सराव सामना आजपासून

अजिंक्य रहाणे

भारत-वेस्ट इंडिज अध्यक्षीय इलेव्हन संघांमधील सराव सामना आजपासून

पीटीआय, कूलिज (अँटिग्वा)

गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेपूर्वी स्वत:च्या तंदुरुस्तीचा आढावा घेऊन लय मिळवण्याचे ध्येय भारतीय खेळाडूंनी बाळगले आहे. त्यामुळे कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि एक महिन्याच्या विश्रांतीनंतर संघात परतणारा जसप्रीत बुमरा हे तिघे शनिवारपासून वेस्ट इंडिज अध्यक्षीय इलेव्हन संघाविरुद्ध रंगणाऱ्या तीनदिवसीय सराव सामन्यात चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतील.

कर्णधार विराट कोहलीच्या उजव्या हाताच्या अंगठय़ाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अभियानाची सुरुवात होण्यापूर्वी संघ व्यवस्थापन त्याला या सामन्यात खेळवून धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे. ३० वर्षीय कोहलीने एकदिवसीय मालिकेत दोन शतकांसह २३४ धावा करताना मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला.

कसोटीतील भारताचा आधारस्तंभ पुजारा जवळपास सात महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पुजारा कसा खेळ करतो, हे पाहणे रंजक ठरेल. उपकर्णधार रहाणेला इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत फारशी चमक दाखवता आली नाही. सात सामन्यांतून एक शतक व एक अर्धशतकासह त्याने २३च्या सरासरीने ३०७ धावा केल्या. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरात त्याला कसोटी सामन्यांत एकही शतक झळकावता आलेले नाही.

बुमराच्या पुनरागमनामुळे वेगवान फळी अधिक सक्षम होणार आहे. इशांत शर्मा, मोहम्मद शमी व उमेश यादव हेसुद्धा बुमराच्या साथीने वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळतील. कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा हे फिरकी त्रिकूटही भारताकडे उपलब्ध असून सलामीवीर म्हणून मयांक अगरवालसह लोकेश राहुल व हनुमा विहारी यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयांक अगरवाल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, उमेश यादव.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 3:36 am

Web Title: west indies cricket board president xi vs india practice match starting today zws 70
Next Stories
1 श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी मालिका : वॉटलिंगच्या अर्धशतकाने न्यूझीलंडला सावरले
2 जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचा भर तंदुरुस्ती आणि बचावावर!
3 ऑलिम्पिक पूर्वतयारी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुषांची लढत मलेशियाशी
Just Now!
X