आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गोलंदाजीच्या अवैध शैलीबद्दल बंदी घातलेल्या सुनील नरिनला त्याच्या वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने पाठिंबा दिला आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून बडतर्फी ही अनुभवी नरिनसाठी मोठा आघात आहे. आम्ही नरिनच्या पाठीशी असून शैलीत सुधारणा करण्यासाठी त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. यापूर्वीही नरिनने आपल्या शैलीतील दोष काढण्यासाठी खूप मेहनत केली होती. त्यामुळे त्याच्या शैलीतील दोष निघून जाईल अशी मला खात्री आहे,’’ असे विंडीज क्रिकेट मंडळाचे संचालक रिचर्ड पायबस यांनी सांगितले. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नरिनच्या शैलीबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या शैलीची बारकाईने तपासणी करण्यात आली व त्याच्या शैलीत दोष असल्याचे निष्पन्न झाले होते.