कॅरेबियन क्रिकेटचे पितामह म्हणून ओळखले जाणारे एव्हर्टन वीक्स यांचे ९५ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते दीर्घकाळ आजारी होते. बुधवारी त्यांनी बार्बाडोस येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

वीक्स यांनी १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. त्यांनी एकूण ४८ कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे त्यांनी ५८ च्या सरासरीने ४,४५५ धावादेखील केल्या. १० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी १५ शतके ठोकली. सलग पाच सामन्यात शतके ठोकण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. पदार्पणाच्या वर्षातच त्यांनी हा पराक्रम केला होता. वीक्स हे तीन W पैकी एक होते. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या उन्नतीसाठी क्लाईड वॉलकॉट, फ्रँक वॉरेल आणि एव्हर्टन वीक्स या तीन W ने मोठे योगदान दिले.

ICC, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड, समालोचक हर्षा भोगले, माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, बीशन सिंग बेदी यांनी सर एव्हर्टन वीक्स यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.

त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.