अँटिग्वाच्या सर व्हिव रिचर्ड्स मैदानावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी यजमान वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. भारताने दिलेल्या ५६६ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात २४३ धावा करणाऱ्या वेस्ट इंडिजचा दुसरा डावदेखील २३१ धावांत आटोपला. त्यामुळे भारताने या सामन्यात एक डाव आणि ९२ धावांनी दणदणीत विजय मिवळ.  आर. अश्विनच्या फिरकीसमोर चौथ्या दिवशी वेस्ट इंडीज संघाची भांबेरी उडाली. पहिल्या डावात  शतक ठोकणाऱ्या अश्विनने दुसऱ्या डावात ७ वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पहिल्या डावात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरीमुळे अष्टपैलू अश्विनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  विराट कोहलीचे द्विशतक आणि अश्विनची शतकी खेळीच्या जोरावर  वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ५६६ धावांचा डोंगर उभा केला. भारताने ८ बाद ५६६ धावावर पहिला डाव घोषित केल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडीजची अवस्था १  बाद ३१ अशी केली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मोहम्मद शमी आणि उमेश यादवच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने अँटिगा कसोटीवर आपली पकड मजबूत केली. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात  उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी चार गडी मिळविले. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात सलामीवीर ब्रेथवेट  वगळता अन्य फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर अपयशी ठरले. शमी आणि उमेश यादवला पहिल्या डावात अमित मिश्राने दोन बळी मिळवून देत सुरेख साथ दिली. दरम्यान, चौथ्या दिवशी फॉलोऑनचा सामना करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला पहिला धक्का देत इशांत शर्माने आपले खाते उघडले.  पहिल्या डावात चिवट खेळी करणाऱ्या सलामीवीर ब्रेथवेटला इशांत शर्माने शून्यावर माघारी पाठविले. त्यानंतर राचंद्र चंदिकाला ३१ धावावर बाद करुन आर अश्विनने विंडिजच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात पकडण्यास सुरूवात केली. उमेश यादव आणि अमित शर्माने प्रत्येकी एक गडी मिळवत अश्विनला योग्य साथ दिली. अवघ्या १३२ धावांतच विंडीजचे ८ फलंदाज माघारी परतले होते. मात्र, कार्लोस ब्रेथवेट आणि देवेंद्र बिशू यांनी ९२ धावांची भागीदारी करत भारताचा विजय लांबवला. अखेर बिशू आणि गॅब्रिएलला माघारी धाडत अश्विनने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.