स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाचे योगदान देतो. भविष्यकाळात तो अनेक विक्रम मोडेल, असे मत अनेकांनी दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत १० गोलंदाजांना ४०० बळी मिळवण्यात यश आले आहे. वेस्ट इंडिजचे महान माजी गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोस यांना बुमराह हा कारनामा करू शकतो, असा विश्वास आहे. अॅम्ब्रोस यांच्या म्हणण्यानुसार, बुमराह कसोटीत ४०० बळी मिळवू शकतो. सध्या बुमराहच्या नावावर १९ कसोटीत ८३ बळी आहेत.

अॅम्ब्रोस हे जसप्रीत बुमराहचे खूप मोठे चाहते आहेत. बुमराहने तंदुरुस्ती कायम राखल्यास तो नि: संशय ४०० कसोटी बळी आपल्या नावावर करू शकेल, असे अॅम्ब्रोस यांना वाटते. अॅम्ब्रोस म्हणाले, ”भारतीय संघात असे अनेक तरूण वेगवान गोलंदाज आहेत जे उत्तम कामगिरी करत आहेत, परंतु बुमराह वेगळा आहे आणि मी त्याचा चाहता आहे. मी पाहिलेल्या सर्व गोलंदाजांच्या तुलनेत बुमराह पूर्णपणे वेगळा आहे. तो एक अतिशय प्रभावी गोलंदाज आहे आणि त्याने अशी कामगिरी करत रहावे अशी माझी इच्छा आहे. जर बुमराह तंदुरुस्त राहिला तर तो बराच काळ कसोटी क्रिकेट खेळू शकेल. त्याच्याकडे यॉर्कर गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. म्हणून मला मनापासून आशा आहे, की जर तो बराच काळ खेळला तर ४०० विकेट घेण्याचा पराक्रम निश्चितच तो करू शकतो.”

कर्टली अॅम्ब्रोस यांनी आपल्या १२ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ९८ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ४०५ बळी आपल्या नावावर केले. अॅम्ब्रोस म्हणाले, ”रनअप कमी असल्यामुळे जसप्रीत बुमराह आपल्या शरीरावर जास्त दबाव टाकतो. परंतु जर तो स्वत: ला तंदुरुस्त ठेवत असेल आणि बराच काळ खेळत असेल, तर नक्कीच मोठे विक्रम तो नोंदवू शकतो. त्याच्या गोलंदाजीच्या वेळी शरीराची लय चांगली असते. अशा परिस्थितीत बुमराहची कसोटी कारकीर्द मोठी होण्यापासून कोणी रोखू शकेलस असे मला वाटत नाही.”