क्रिकेटविश्वातील दोन दिग्गज मानले जाणारे सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा पुन्हा एकदा एकमेकासंमोर उभे ठाकणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा पहिला उपांत्य सामना इंडिया लीजण्डस  आणि वेस्ट इंडिज लीजण्डस  यांच्यात होणार असून या निमित्ताने ते आमनेसामने असतील. आज 17 मार्चला रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा सामना सायंकाळी 7 पासून खेळला जाईल.

आपल्या फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिज लीजण्डसने मंगळवारी खेळलेल्या उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड लीजण्डसचा 5 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा फटकावल्या. पण प्रत्युत्तरात ड्वेन स्मिथ (58 धावा, 9 चौकार, 2 षटकार) आणि नरसिंग देवनारायण (नाबाद 53, 6चौकार) यांच्या उत्कृष्ट अर्धशतकांच्या मदतीने कॅरेबियन संघाने इंग्लंडचा एकतर्फी पराभव केला. विंडीजचा हा सहा सामन्यांमधील तिसरा विजय आहे. विंडीजचा नेट रनरेट इंग्लंडपेक्षा चांगला असल्याने त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता आले.

सामन्याआधी सचिनचा संघासोबत सराव

तर, इंडिया लीजण्डसने सहापैकी पाच सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्ध त्यांना एकमेव पराभव स्वीकारावा लागला होता. आज होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी  दुपारी नेट्समध्ये कसून सराव केला. कर्णधार सचिन तेंडुलकरने स्वत: सराव सत्राचे नेतृत्व केले.

या मालिकेचा दुसरा उपांत्य सामना 19 मार्च रोजी श्रीलंका लीजण्डस  आणि दक्षिण आफ्रिका लीजण्डस यांच्यात खेळला जाईल. श्रीलंकेच्या संघाने सहा पैकी पाच सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. त्याचे एकूण 20 गुण आहेत. तर, दक्षिण आफ्रिकाने उपांत्य फेरीपर्यंत प्रवेश करण्यासाठी सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. त्याच्या खात्यात त्याला एकूण 16 गुण आहेत.

इंग्लंड-बांगलादेश बाहेर

इंग्लंड आणि बांगलादेश या संघांना यंदा स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. बांगलादेशने सहापैकी फक्त एक सामना जिंकला असून तर इंग्लंडने सहापैकी तीन जिंकले आणि तीन गमावले आहेत.