पाकिस्तानचे नजाम सेठी व वेस्ट इंडिजचे डेव्हिड कॅमेरॉन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्यकारिणीवर निवड झाली आहे. या कार्यकारिणीत परिषदेचे नूतन अध्यक्ष व भारताचे एन. श्रीनिवासन यांचाही समावेश आहे.
कार्यकारिणी समितीचे अध्यक्षपद ऑस्ट्रेलियाचे व्ॉली एडवर्ड्स भूषवित असून या समितीत इंग्लंडच्या गिलेस क्लार्क यांनाही स्थान मिळाले आहे. या दोघांच्याही नियुक्तीस श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आयसीसी नियामक मंडळाने हिरवा कंदील दाखविला आहे. परिषदेच्या पाच सदस्यांच्या समितीत भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या देशांच्या प्रतिनिधींना कायम स्वरूपाचे स्थान देण्यात आले आहे. अन्य दोन सदस्यांची दरवर्षी निवड केली जाणार आहे. परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डेव्हिड रिचर्ड्सन हे या समितीचे सन्माननीय सदस्य असतील.
कार्यकारिणी समितीला सर्व आर्थिक व्यवहार, घटनात्मक, मनुष्यबळ विकास, भ्रष्टाचार प्रतिबंधक, नीतीमूल्ये समिती, संघटना विकास आदीबाबत सर्वाधिकार देण्यात आले आहेत. क्लार्क यांच्याकडे आर्थिक व व्यापारी कामकाज समितीचे अध्यक्षपद सोपविले असून या समितीत एडवर्ड्स, श्रीनिवासन यांच्याबरोबरच नझामुल हसन (बांगलादेश) व जयंता धर्मसेना (श्रीलंका) यांचा समावेश आहे तर रिचर्डसन हे अशासकीय सदस्य असतील.
आयसीसी विकास समितीची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे. आयसीसीचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील. आयसीसीच्या नियामक मंडळ व मुख्य कार्यकारी समितीचे प्रत्येकी तीन सदस्यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. त्याखेरीज झिम्बाब्वे, वेस्टइंडिज व न्यूझीलंड क्रिकेट मंडळाच्या पूर्णवेळ संचालकांचा त्यामध्ये समावेश राहील. तसेच रिचर्डसन व टीम अँडरसन यांनाही स्थान मिळाले आहे.